बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन 90 लाखांची फसवणुक

कंपनीच्या संचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बुक केलेल्या फ्लॅटची दुसर्‍या व्यक्तीला परस्पर विक्री करुन एका विमा एजंटची सुमारे 90 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिद्धीटेक डेव्हल्पर्स कंपनीचे दोन संचालकासह तिघांविरुद्ध दादर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हेमंत मोहन अग्रवाल, नेहा हेमंत अग्रवाल आणि गौतम हंजारीलाल त्रिवेदी अशी या तिघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत या तिघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

पारसमल राजमल जैन हे विमा एजंट असून ते परळ येथील चिंचापोकळी परिसरात राहतात. त्यांना उत्तर-पश्चिम उपनगरातील एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यासाठी ते त्यांच्या बजेटमधील फ्लॅट शोधत होते. तेरा वर्षांपूर्वी त्यांच्या एका मित्राने त्यांची इस्टेट एजंट म्हणून काम करणार्‍या गौतम त्रिवेदीशी भेट घडवून आणली होती. त्याने त्यांची ओळख सिद्धीटेक डेव्हल्पर्सचे पार्टनर विजय गंगारामाणी आणि हेमंत अग्रवालशी करुन दिली होती. त्यांनी त्यांना त्यांच्या कंपनीचे दहिसर येथील जयवंत सावंत मार्ग, रामचंद्र दास रोडवर सिद्धी समर्पण नावाच्या एका इमारतीच्या प्रोजेक्टची माहिती दिली होती. त्यांचा विश्वास बसवा म्हणून त्यांनी त्यांना बांधकाम साईटची पाहणी करण्यास सांगितले होते. त्यामुळे ते तिथे गेले होते. यावेळी त्यांना इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे दिसून आले.

ही जागा अवडल्याने त्यांनी तिथे एक फ्लॅट घेण्याचे ठरविले होते. यावेळी हेमंत अग्रवालने त्यांनपाा चौदाव्या मजल्यावर 1402 फ्लॅट 73 लाख 50 हजार रुपयांमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला फेब्रुवारी 2012 ते मे 2014 या कालावधीत 45 लाख 10 हजार रुपये दिले होते. काही दिवसांनी त्यांना हेमंत आणि गौतमने कॉल करुन चौदाव्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री झाली आहे. त्यामुळे त्यांना 24 व्या मज्यावर थ्री बीएचके फ्लॅट देतो असे सांगून त्याची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये सांगितले होते. त्यामुळे त्यांनी टू बीएचकेऐवजी थ्री बीएचके फ्लॅट घेण्याचे फायनल केले. यावेळी त्यांनी त्यांना फ्लॅटचे अ‍ॅलोटमेंट लेटर दिले होते.

याच फ्लॅटसाठी त्यांनी त्यांना नोव्हेंबर 2014 ते मे 2015 या कालावधीत 45 लाख 50 हजार रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांना इंडिया लॉ अ‍ॅलायन्सकडून एक लिगल नोटीस प्राप्त झाली होती. त्यात या इमारतीमधील 40 फ्लॅटचे अ‍ॅग्रीमेंट टू सेल इंदिरा राडिया आणि महेश शहा यांनी केले आहे. त्यात त्यांच्या 2401 क्रमांकाचा फ्लॅटचा समावेश होता. त्यामुळे त्यांनी हेमंत अग्रवालकडे विचारणा केली होती. यावेळी त्यांनी तिथेच फ्लॅट देण्याचे, फ्लॅट दिला नाहीतर त्यांची मूळ रक्कम व्याजासहीत देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे त्यांनी फ्लॅटसाठी सर्व्हिस टॅक्ससह इतर कामासाठी हेमंत अग्रवालला 90 लाख 60 हजार 204 रुपये दिले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यांच्या फ्लॅटची त्याने हर्षल राऊत या व्यक्तीला परस्पर विक्री केल्याचे समजले. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्यांना दुसरा फ्लॅट देतो असे सांगितले, मात्र त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. फ्लॅटच्या आमिषाने त्यांनी त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे पारसमल जैन यांनी दादर पोलीस ठाण्यात सिद्धीटेकचे संचालक हेमंत अग्रवाल, नेहा अग्रवाल आणि इस्टेट एजंट गौतम त्रिवेदी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून चौकशी सुरु असून या तिघांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page