मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – अनधिकृतपणे पत्रे लावलेल्या रो हाऊसवर कारवाई न करण्यासाठी दोन लाखांची लाचेची मागणी करुन लाचेचा पहिला 40 हजार रुपयांचा हप्ता घेताना म्हाडा अधिकार्याला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. रणजीत बाळासाहेब चव्हाण असे या अधिकार्याचे नाव असून ते वांद्रे येथील म्हाडा, कार्यकारी अभियंता विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून काम करतात. या कारवाईने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदाराच्या पत्नीचे रो हाऊस आहे. या रो हाऊसमध्ये तिने अनधिकृत पत्रे चढवून तो रो हाऊस पेईंग गेस्ट व्यवसायासाठी दिला होता. अलीकडेच रणजीत चव्हाण यांच्यासह इतर अधिकार्यांनी तिथे जाऊन पाहणी केली होती. या पाहणीत रो हाऊसमध्ये तक्रारदाराच्या पत्नीने अनधिकृतपणे पत्रे लावल्याचे दिसून आले होते. त्याचा रिपोर्ट नंतर वरिष्ठांना देण्यातआला होता. त्यानंतर तक्रारदारांना म्हाडाकडून नोटीस पाठवून रो हाऊसवर कारवाईचे संकेत देण्यात आले होते.
या नोटीसनंतर तक्रारदार म्हाडा कार्यालयात आले होते. त्यांनी रणजीत चव्हाण यांची भेट घेऊन मदत करण्याची विनंती केली होती. यावेळी रणजीत चव्हाण यांनी त्यांच्या रो हाऊसवर कारवाई न करण्यासाठी चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना दोन लाख रुपयांची लाच देण्याची तयारी दर्शविली होती. त्यांनीही दोन लाख रुपये घेण्याचे मान्य केले होते. ही रक्कम देण्याची तयारी दर्शविल्यानंतर गुरुवारी 9 ऑक्टोंबरला तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात रणजीत चव्हाण यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी तक्रार केली होती.
या तक्रारीची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात रणजीत चव्हाण यांनी रो हाऊसवर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन लाखांची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या अधिकार्यांनी म्हाडा कार्यालयाजवळ सापळा लावला होता. यावेळी लाचेचा चाळीस हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यासाठी तक्रारदार तिथे गेले होते. त्यांच्याकडून ही रक्कम घेताना रणजीत चव्हाण यांना या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले.
सहाय्यक पोलीस आयुक्त मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गणपत परचाके यांच्यासह इतर पोलीस कर्मचार्यांनी ही कारवाई केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.