आर्थिक वादातून गुन्हेगार मित्राच्या घरात घुसून गोळीबार
ऍण्टॉप हिल येथील घटना; आरोपी मित्राचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ एप्रिल २०२४
मुंबई, – आर्थिक वादातून आकाश गणेश कदम या मित्राच्या घरात घुसून त्याच्याच मित्राने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना ऍण्टॉप हिल परिसरात घडली. गोळीबारात आकाश हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी विवेक शेट्टीयार या आरोपी मित्राविरुद्ध ऍण्टॉप हिल पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह आर्म्स ऍक्ट कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या विवेकच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आकाश आणि विवेक हे दोघेही गुन्हेगार असून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक वाद सुरु असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना शनिवारी सकाळी पाच वाजता ऍण्टॉप हिल येथील नाईकनगर, कृष्णा हॉटेलजवळील नवतरुण परिसरात घडली. याच परिसरात आकाश हा त्याची आई वासंती गणेश कदम हिच्यासोबत राहत होता. विवेक हा त्याचा मित्र असून ते दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये आर्थिक वाद सुरु होता. हा वाद विकोपास गेला होता. त्यातून शनिावारी सकाळी पाच वाजता विवेक हा आकाशच्या घरी आला होता. त्याने आकाशच्या दिशेने गोळीबार केला. त्यात त्याच्या पोटात गोळी लागली होती. गोळीबारानंतर आरोपी तेथून पळून गेला. जखमी झालेल्या आकाशला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर तिथे उपचार सुरु आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच ऍण्टॉप हिल पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी वासंती कदम हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विवेकविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासात आकाश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो पूर्वी धोबीघाट परिसरात राहत होता. नंतर तो ऍण्टॉप हिल येथे राहण्यासाठी आला होता. त्याचे विवेकसोबत आर्थिक वाद सुरु होता. त्यातून त्याने हा गोळीबार केला. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या आठ विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या पथकाने आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. सकाळी झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.