मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
उरण, – भरवेगात जाणार्या एका क्रेटा कारची स्कूटी धडक लागून झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची लहान मुलगी गंभीररीत्या जखमी झाली. मृतांमध्ये पवित्र मोहन बराल आणि रश्मीता पवित्र बराल यांचा तर जखमीमध्ये परी पवित्र बराल हिचा समावेश आहे. तिच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जाते. अपघातानंतर आरोपी कारचालक जय चंद्रहास घरत याने जखमींना कुठलीही वैद्यकीय मदत न करता तिथे कर्तव्य बजाविणार्या आरपीएस पोलीस हवालदार अतुल राजेंद्र चौहाण यांना दमदाटी करुन त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी जय घरतविरुद्ध उरण पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून दोघांच्या मृत्यूस तर एक मुलीला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच पोलीस हवालदाराला दमदाटीसह मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
हा अपघात शनिवारी रात्री पावणेअकरा वाजता उरण रेल्वे स्थानकासमोरील बोकडवीराकडून उरणकडे जाणार्या रस्त्यावर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पवित्र बराल हे रायगडच्या उरण, बोरीपाखाडीचे रहिवाशी आहेत. शनिवारी ते त्यांच्या पत्नी रश्मीता आणि मुलगी परी हिच्यासोबत त्यांच्या स्कूटीवरुन जात होते. रात्री पावणेअकरा वाजता एका क्रेटा कारचालकाने भरवेगात कार चालविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या स्कूटीला जोरात धडक दिली होती. या अपघातात प्रविण, रश्मीता आणि परी हे तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खाडे व अन्य पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे पवित्र आणि रश्मीता या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. परीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. अपघाताच्या वेळेस आरपीएफचे पोलीस हवालदार अतुल राजेंद्र चौहाण हे घटनास्थळी होते. यावेळी कारचालक जय घरत याने जखमींना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्याने पोलीस हवालदार अतुल चौहाण यांच्याशी हुज्जत घालून त्यांच्या जोरात कानशिलात लगावली होती. त्यांच्या वर्दीचे नेमप्लेटजवळ कॉलर पकडून त्यांना जोरात धक्का दिला. शिवीगाळ करत यह पडी हुई डेडबॉडी को हटा असे बोलून उपस्थित लोकांशी हुज्जत घातली आणि घटनास्थळाहून पलायन केले होते. या प्रकारानंतर अतुल चौहाण यांची जबानी नोंदवून उरण पोलिसांनी जय घरत याच्याविरुद्ध ३०४ अ, ३५३, २७९, ३३७, ३३८ भादवी सहकलम १८२, १३४ अ, १३४ ब, मोटार वाहतूक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पळून गेलेल्या जय घरतचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.