आर्थिक वादातून पायलटला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण

माजी पायलट, त्याची पत्नीसह बॉडीगार्डविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – आर्थिक वादातून एअर इंडियाच्या एका 55 वर्षांच्या पायलटला त्याच्या माजी पायलट, त्याची पत्नी आणि त्यांच्या चार बॉडीगार्डने घरात बोलावून बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी निरा देवेन कनानी, देवेन योगेश कनानी आणि चार बॉडीगार्ड अशा सहाजणांविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील देवेन हा माजी पायलट असून तो तक्रारदाराचा जवळचा मित्र असल्याचे बोलले जाते. या घटनेनंतर सहाही आरोपी पळून गेल्याने त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजता गोरेगाव येथील न्यू लिंक रोड, लक्ष्मीनगरच्या गार्डन इस्टेट इमारतीच्या बी विंगच्या फ्लॅट क्रमांक 1401 मध्ये घडली. कपिल उपेंद्रनाथ कोहल हे अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड परिसरात राहतात. त्यांच्यासह त्यांची त्यांची पत्नी प्रिती आणि मुलगा आर्यन हे तिघेही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कामाला आहेत. 1995 साली ते पायलट ट्रेनिंगसाठी उत्तरप्रदेशातील रायबरेली येथे गेले होते. तिथेच त्यांची ओळख देवेन कनानीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. ट्रेनिंगनंतर या दोघांनाही एअर इंडियामध्ये पायलटची नोकरी मिळाली होती, मात्र देवेनला कंपनीने कामावरुन काढून टाकले होते.

नोव्हेंबर 2024 कपिल कोहल हे हिमाचल प्रदेशात गेले होते. यावेळी त्यांना देवेनने कॉल करुन त्याला पैशांची तातडीने गरज असल्याचे सांगून त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून देवेनला पाच लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. एक महिन्यांत पाच लाख रुपये परत करण्याचे त्याने आश्वासन दिले होते, मात्र तीन ते चार महिने उलटूनही त्याने त्यांना पैसे दिले नाही. विचारणा केल्यांनतर अद्याप पैशांची व्यवस्था झाली नाही, काही दिवसांनी त्याचे पैसे देतो असे सांगत होता. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता देवेनने त्यांना कॉल करुन पाच लाख रुपये घेऊन जाण्यास सांगितले.

ठरल्याप्रमाणे शनिवारी रात्री कपिल कोहल हे पैसे घेण्यासाठी देवेनच्या गोरेगाव येथील न्यू लिंक रोड, लक्ष्मीनगरच्या फ्लॅट क्रमांक बी/1401 मध्ये घरी गेले होते. यावेळी त्याच्या घरी असलेल्या चार बॉडीगार्डसारख्या दिसणार्‍या व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ करुन हाताने तसेच लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात त्यांच्या पाठीला, कमरेला, मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्यापैकी एकाने देवेनची पत्नी निराकडे बोट दाखवून ती त्याची पत्नी असल्याचे सांगितले, बाजूला देवेन बसला होता, याबाबत तो त्याला काही बोलला नाही. यावेळी देवेनने त्याची पत्नी निराचे पाय पकडून त्यांना वारंवार माफी मागण्यास प्रवृत्त केले होते.

या घटनेदरम्यान त्यांनी त्यांचे लाईव्ह लोकेशन त्यांचा मुलगा क्रिशला पाठवून तिथे पोलिसांसोबत येण्यास सांगितले. काही वेळानंतर तिथे पोलीस आले होते. याच दरम्यान ते सर्वजण तेथून पळून गेले होते. मारहाणीत कपिल कोहल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर कपिल कोहल हे बांगुरनगर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी घडलेला प्रकार उपस्थित पोलिसांना सांगितला.

त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी निरा कनानी, देवेन कनानीसह इतर चार बॉडीगार्ड अशा सहाजणांविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सर्व आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गरजेच्या वेळेस मित्राला पाच लाखांची मदत करणे आणि उसने पैसे मागणे कपिल कोहल यांना चांगलेच महागात पडले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page