गँगस्टर आबू सालेमच्या नावाने वयोवृद्धाला 71 लाखांना गंडा
कमिशनसह दहशतवादी संघटनेला मदत केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – मुंबई शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेतील एक मुख्य सूत्रधार आणि कुख्यात गॅगस्टर आबू सालेमच्या नावाने एका वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने सुमारे 71 लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. तक्रारदार वयोवृद्धाचे आबू सालेमशी संबंध असून त्याच्याकडून त्यांना दहा टक्के कमिशन मिळाल्याचे, त्यांचे भारतविरोधी कारवाया करणार्या दहशतवादी संघटनेशी संबंधासह या संघटनेला मदत केल्याचा आरोप करुन त्यांच्यावर डिजिटल अटकेची कारवाईची भीती दाखवून ही रक्कम उकाळण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी चार अज्ञात सायबर ठगांविरुद्ध पूर्व प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. फसवणुकीसाठी सायबर ठगाकडून पहिल्यांदाच कुठल्या गँगस्टरचा वापर झाल्याचे बोलले जाते.
गेल्या काही वर्षांत डिजीटल अरेस्टची भीती दाखवून ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. पोलीस, ईडी, सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ही फसवणुक होत असताना आता सायबर ठगांकडून गॅगस्टर आबू सालेमसह दहशतवादी संघटनेच्या नावाने लोकांची विशेषता वयोवृद्धांची फसवणुक होत असल्याचे एका घटनेवरुन उघडकीस आले आहे. 67 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मुलुंडच्या म्हाडा कॉलनीतील रहिवाशी आहेत. ते रायगडच्या अलिबाग, आरोग्य विभागात लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होते. 2017 साली ते निवृत्त झाले असून त्यांच्या पेंशनवर त्यांच्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह चालतो.
23 सप्टेंबर 2025 रोजी ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने तो पोलीस उपनिरीक्षक संदीपराव असल्याचे सांगून त्याचे ओळखपत्र पाविले होते. त्यांच्याविरुद्ध नाशिक पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. ते लोकांमध्ये दशहत निर्माण करत असून त्यांचे एका बँकेत खाते आहेत. कुख्यात गुंड आबू सालेम याने त्यांना कमिशन म्हणून दहा टक्के कमिशन पाठविले आहे. या बँकेचे स्टेटमेंट आणि एटीएम कार्ड त्यांच्याकडे असून त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने संबंधित स्टेटमेंट आणि एटीएमची माहिती त्यांना शेअर केली होती. इतकेच नव्हे तर त्यांचा भारतविरोधी कारवाया करणार्या एका दहशतवादी संघटनेशी संबंध असून ते या संघटनेला मदत करत असल्याचा आरोप केला होता.
23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर या कालावधीत त्याने त्यांना व्हिडीओ कॉलद्वारे त्यांच्याविरुद्ध आलेल्या शांती सेवा न्याय यांच्या नावाने आलेल्या तक्रार अर्जाची, या अर्जात त्यांच्याविरुद्ध गुंतवणुक फसवणुकीसह इतर गुन्ह्यांचा सहभाग असल्याचे सांगितले होते. या गुन्ह्यांत दहा मोस्ट वॉण्टेड आरोपींचा सहभाग असून त्यात त्यांचा समावेश आहे. या दहाजणांचे फोटो आणि त्यांच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची एक प्रत पाठविली होती. याच गुन्ह्यांत त्यांची चौकशी होणार असून या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. या कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने त्यांच्याकडून 29 लाख 95 हजार 828 रुपये घेतले होते.
ही रक्कम त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. चौकशीनंतर ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर होईल असेही सांगितले होते. या पेमेंटनंतर पोलीस उपनिरीक्षक संदीपरावने प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून त्यांना आणखीन काही रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितले होते. कारवाईसह अटकेच्या भीतीने त्यांनी त्याला आणखीन काही रक्कम पाठविली होती.
23 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत त्यांनी संबंधित पोलीस अधिकार्याच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या बँक खात्यात 71 लाख 24 हजार 528 रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र चौकशी पूर्ण होऊन, प्रकरण मिटविल्याचा दावा करुनही त्याने त्यांची रक्कम परत केली नाही. कॉल केल्यानंतर त्याच्याकडून त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. ऑनलाईन फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चार अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पूर्व सायबर सेल पोलिसांनी तोतयागिरी करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे या भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.