शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 75 लाखांची फसवणुक

बँक अधिकार्‍याच्या तक्रारीवरुन मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मे 2026
मुंबई, – शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चार टक्के परताव्याचे आमिष दाखवून एका नामांकित बँक अधिकार्‍याची सुमारे 75 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्वनाथ लक्ष्मण मिस्त्री या मुख्य आरोपीविरुद्ध भायखळा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. विश्वनाथने तक्रारदारासह अनेकांना शेअर गुंतवणुकीच्या नावाने गंडा घातला असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी विश्वनाथ हा त्याच्या कुटुंबियासोबत पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

36 वर्षांचे तक्रारदार मेहबूब मोईनद्दीन सय्यद हे वडाळा येथे राहतात. सध्या ते एका खाजगी नामांकित बँकेत सिनिअर मॅनेजर म्हणून काम करत असून त्यांची पोस्टिंग फोर्ट येथील शाखेत आहे. चार वर्षांपूर्वी ते चर्चगेट येथील दुसर्‍या बँकेत असताना बँकेच्या एका अधिकार्‍याने त्यांची विश्वनाथ मिस्त्रीशी ओळख करुन दिली होती. तो शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम करत असून चांगला परतावा देत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. मार्च 2024 रोजी त्यांची विश्वनाथशी पुन्हा भेट झाली होती. यावेळी त्याने त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना चांगला परतावा देतो असे आमिष दाखविले होते.

इतकेच नव्हे तर वीस लाखांची गुंतवणुकीवर त्यांना चार टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी त्याच्याकडे शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला वीस लाख रुपये ट्रान्स्फर केले. या गुंतवणुकीवर त्याने त्यांना ऐंशी हजार परतावा देण्यात दिला होता, त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्वास बसला होता. याच दरम्यान त्यांच्या मित्राने त्यांना कर्ज काढून शेअरमध्ये गुंतवणुक करा. जेणेकरुन त्यांना जास्त परतावा मिळेल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी पर्सनल लोन काढून विश्वनाथकडे आणखीन 55 लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीने त्याने त्यांना काही महिने नऊ लाख दहा हजाराची परताव्याची रक्कम दिली. मात्र नंतर त्याने परताव्याची रक्कम देणे बंद केले.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी विश्वनाथची चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांना विश्वनाथने त्यांच्यासह इतर अनेक लोकांना शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यांच्याकडून लाखो रुपये गुंतवणुकीच्या नावावर घेऊन त्यांना काही महिने परताव्याची रक्कम दिली. नंतर त्याने परताव्याची रक्कम देणे बंद केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विश्वनाथकडे त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुक केलेल्या 75 लाखांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांना आठवड्याभरात ही रक्कम देण्याचे मान्य केले. मात्र आठवडा होऊन त्याने त्यांना पैसे दिले नाही. त्यामुळे ते त्याच्या घरी गेले होते, तिथे त्यांना विश्वनाथ हा त्याच्या कुटुंबियांसोबत पळून गेल्याचे तसेच त्याच्या फ्लॅटवर कुलूप लावलेले असल्याचे दिसून आले.

ऑक्टोंबर 2024 ते मे 2026 या कालावधीत विश्वनाथने शेअरमध्ये गुंतवणुकीवर चार टक्के परताव्याचे गाजर दाखवून त्यांना 75 लाख रुपये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले, या गुंतवणुकीवर नऊ लाख रुपये परतावा देऊन उर्वरित रक्कमेचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विश्वनाथ मिस्त्रीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने विश्वनाथने अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page