मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मे 2026
मुंबई, – रिक्षाचालक समजून रोडसाईडवर झोपलेल्या मोहम्मद युसूफ या 55 वर्षांच्या व्यक्तीची हत्या करुन उत्तरप्रदेशात पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस पवई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. प्रमोद रामकृपाल वर्मा असे या 24 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. हत्येनंतर तो मुंबईहून उत्तरप्रदेशात पळून गेला होता. अटकेच्या भीतीने प्रमोदने स्वतचा पेहराव बदलून केस कापून ओळख लपविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत दोन दिवसांपूर्वी दिपक ऊर्फ दिपू नथूप्रसाद वर्मा याला गुजरात येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला पवई पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.
25 मेला रात्री उशिरा पवईतील साकीविहार रोड, तुंगा गाव, लोढा सुप्रिमस आऊट गेटजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती पवई पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्तबंबाळ पडलेल्या संबंधित व्यक्तीला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या व्यक्तीच्या शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. त्याची हत्या झाल्याचे उघडकीस येताच पोलीस शिपाई विजय अरुण घाडगे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. आरोपीचा शोध सुरु असताना दिपू वर्मा याला गुजरात येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीतून प्रमोद वर्मा याचे नाव समोर आले होते. या हत्येत तोच मुख्य आरोपी असून त्याने मोहम्मद युसूफची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली होती. या हत्येनंतर तो मुंबईहून उत्तरप्रदेशात पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एक टिम उत्तरप्रदेशात पाठविण्यात आले होते.
या पथकाने त्याला उत्तरप्रदेशातील बांदा, सुदामपुरी, वॉर्ड क्रमांक चार परिसरातून ताबत घेतले. अटकेच्या भीतीने प्रमोदने स्वतचा पेहराव पूर्ण बदलला होता, केस कापून ओळख लपविण्याचा प्रयत्न केला होता. तरीही त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. हत्येच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत बंडगर, जयदीप गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक यश पालवे, सागर पवार, गणेश आव्हाड, राकेश नलावडे, प्रशांत केंद्रे, सुहास कांदे, मनोज भोसले, पोलीस हवालदार तानाजी टिळेकर, रमेश नलावडे, मारुती सुरनार, जयदेव चव्हाण, अजिंक्य झेंडे, संदीप सुरवाडे, विशाल पिसाळ, विकास वाघचौरे, बाबू येडगे, अक्षय सातपुते, पोलीस शिपाई सदाशिव वारंग, संदीप राठोड, सूर्यकांत शेट्टी, अर्जुन राठोड, प्रदीप शिरसाट, दिनेश बद्रे, प्रविण जाधव यांनी केली.