शेअर ट्रेडिंगद्वारे 68 लाखांना गंडा घालणार्‍या दुकलीस अटक

फसवणुकीसाठी बोगस कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडले

0

अरुण सावरटकर
28 मे 2026
मुंबई, – शेअर ट्रेडिंगद्वारे एका विदेशी बँक अधिकार्‍याची 68 लाखांची फसवणुक केल्याच्या कटातील दोन भामट्यांना पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. प्रकाश रतलानी आणि रुपेश अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. या दोघांनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना वेगवेगळया बोगस कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडून दिले होते. यातील दोन बँक खात्यात फसवणुकीची 16 लाख आणि 1 लाख 43 हजार रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांचे कमिशन मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

आशिष लिंगप्पा अमीन हे सांताक्रुज येथे राहत असून एका विदेशी बँकेत नोकरी करतात. 24 फेब्रुवारीला ते इंटाग्राम पाहत असताना त्यांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल अशी एक पोस्ट दिसली होती. त्यात एका व्हॉटअप ग्रुपची लिंक होती. ही लिंक ओपन केल्यानंतर ते व्हीआयपी13 स्टॉक या व्हॉटअप ग्रुपमध्ये अ‍ॅड झाले होते. या गु्रपमध्ये शेअरशी संबंधित अनेक टिप्स दिले जात होते. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास गुंतवणुकदारांना किती फायदा होईल याबाबत माहिती दिली जात होती. ग्रुपमधील माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांना ग्रुपमधील अनेकांनी शेअरमध्ये गुंतवणुक केल्याचे तसेच या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले.

काही दिवसांनी त्यांना ग्रुप अ‍ॅडमिन राहुल वर्माने संपर्क साधून त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांनी टप्याटप्याने काही रक्कम शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळत होता. विशेष म्हणजे ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट ट्रान्स्फर होत होती. त्यामुळे त्यांना राहुलसह इतरावर विश्वास बसला होता. याच दरम्यान राहुलने त्यांना जास्त रक्कम गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. जेणेकरुन त्यांना जास्त परतावा मिळेल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी विविध शेअरमध्ये फेब्रुवारी ते एप्रिल 2026 या कालावधीत 68 लाख 28 हजार 878 रुपयांची गुंतवणुक केली होती.

या गुंतवणुकीवर सांगितल्याप्रमाणे त्यांना चांगला फायदा झाला होता. मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना राहुलसह इतर कर्मचार्‍यांनी प्रतिसाद दिला नाही. याबाबत त्यांनी त्यांच्या सहकार्‍याशी चर्चा केली होती, यावेळी त्यांनी त्यांना त्यांची सायबर ठगांनी फसवणुक केल्याचे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी सायबर हेल्पलाईनसह पश्चिम सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी फसवणुकीची रक्कम जमा झालेल्या बँंक खात्यासह खातेदाराची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी प्रकाश आणि रुपेश या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला आहे. या दोघांनी दोन वेगवेगळ्या बँकेत बोगस कंपन्याच्या नावाने खाते उघडले होते. त्यापैकी एका बँक खात्यात 16 लाख तर दुसर्‍या बँक खात्यात 1 लाख 43 हजार रुपये अशी फसवणुकीची रक्कम जमा झाले होते. ही रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर त्यांना पाच लाख रुपयांचे कमिशन मिळणार होते, मात्र सायबर ठगांनी त्याला दोन लाख रुपये दिले होते.

फसवणुकीसाठी त्यांनी सायबर ठगांच्या सांगण्यावरुन बँकेत खाती उघडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या दोन्ही बँक खात्यात इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाल्याचा संशय असून त्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटातील मुख्य सूत्रधार फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page