विभक्त राहणार्‍या पत्नीच्या प्रियकराची पतीकडून हत्या

हत्येचा गुन्हा दाखल होताच पतीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मे 2026
मुंबई, – बेरोजगार पतीकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून विभक्त राहणार्‍या पत्नीच्या प्रियकराची पतीने लाथ्याबुक्यांनी मारहाण तसेच दगडाने ठेचून हत्या केलची घटना रे रोड परिसरात उघडकीस आली आहे. अन्सार रसुल शेख असे या हत्या झालेल्या प्रियकराचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी इदू शेख याला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पत्नी प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून त्याने ही हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ही घटना बुधवारी 27 मेला रात्री दहा ते सव्वादहा वाजता रे रोड रेल्वे स्थानकाजवळ घडली. 26 वर्षांची तक्रारदार महिला याच परिसरात राहत असून ती नोकरी करते. तिचा इदू हा पती असून तो काहीच कामधंदा करत नाही. त्याला नशा करण्याचे व्यसन होते, त्यातून तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. त्याच्या छळाला कंटाळून तिने त्याला सोडून दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून ती अन्सार शेख याच्यासोबत राहत होती. या दोघांचे प्रेमसंबंध होते, त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

अन्सार हा बीपीटीमध्ये मजुरीचे काम करतो. पत्नी सोडून अन्सारसोबत राहत असल्याच्या इदूच्या मनात प्रचंड राग होता. त्याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी रात्री दहा वाजता पत्नीच्या घरी गेला होता. यावेळी त्याने त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात त्याने अन्सारला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहण केली. त्याला जमिनीवर जोरात आपटले, त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. याच अवस्थत त्याने त्याच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. हल्ल्यानंतर इदू शेख तेथून पळून गेला.

हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी अन्सारला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page