रोटीवर थुंकून ग्राहकांना दिले जात असल्याचा प्रकार उघड

गोरेगावच्या फिश कोळीवाडा हॉटेलमधील किळसवाणा प्रकार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मे 2026
मुंबई, – रोटी बनविताना प्रत्येक रोटीवर थुंकून भट्टीत टाकून नंतर ग्राहकांना थुंकलेली रोटी दिली जात असल्याचा धक्कादायक तसेच किळसवाणा प्रकार गोरेगाव येथील संतोषनगर, ए वॉर्डच्या फिश कोळीवाडा हॉटेलमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी हॉटेलचा मालक फैय्याज अहमद शेख आणि कुक कौशार गफार शेख यांच्याविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांना चौकशीनंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.

दिपक दत्ताराम पवार हे व्यावसायिक असून ते त्यांच्या वयोवृद्ध वडिलांसोबत गोरेगाव येथील संतोषनगर, बीएमसी कॉलनीत राहतात. त्यांच्या घरी जेवण बनविण्यासाठी कोणी महिला नसल्याने ते नेहमी हॉटेलमधून जेवण करतात. त्यांच्या वडिलांसाठी त्यांची बहिण जेवण पाठवते. शनिवारी 23 मेला रात्री साडेदहा वाजता ते एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. तिथे गर्दी असल्याने ते पुढे दुसर्‍या हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघाले. काही अंतरावर असलेल्या फिश कोळीवाडा हॉटेलजवळ आले असता त्यांना हॉटेलमध्ये जेवण बनविणारा कुक रोटीवर थुंकत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी हा प्रकार थांबून पाहिला असता संबंधित व्यक्ती प्रत्येक रोटीवर थुंकून भट्टीत गरम करताना दिसून आले.

तीच रोटी नंतर हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांना दिली जात होती. या प्रकाराचा त्यांनी त्यांच्या मोबाईलवर व्हिडीओ बनविला होता. हा व्हिडीओ त्यांनी हॉटेलच्या कर्मचार्‍यासह स्थानिक रहिवाशांना दाखविला. काही वेळात हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा किळसवाणा व्हिडीओ पाहिल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड धक्का बसला होता. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोमवारी रात्री दहा वाजता त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करुन ही माहिती दिली होती. या माहितीनंतर दिडोंशी पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले होते. यावेळी पोलिसांनी फिश कोळीवाडा हॉटेलचा मालक फैय्याज शेख आणि रोटी बनविणारा कुक कौशर शेख या दोघांनाही ताब्यात घेतले.

चौकशीत कौयर हा उत्तरप्रदेशच्या बलिया, मोरयारीच्या चितोणी गावचा रहिवाशी आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो फिश कोळीवाडा हॉटेलमध्ये रोटी बनविण्याचे काम करत होता. रोटी बनविताना तो प्रत्येक रोटीवर थुंकत होता, त्यानंतर ती रोटी भट्टीमध्ये टाकून हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांना देत होता. ती रोटी लोकांच्या आरोग्यास अपायकारक असल्याचे माहिती असताना तो काही महिन्यांपासून रोटीवर थुंकून ती रोटी ग्राहकांना देत होता. त्याच्या या कृत्यास मालक म्हणून फैय्याज शेख यांनी लक्ष ठेवणे गरजेचे होते. मात्र त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते.

त्यामुळे कौशार शेख आणि फैय्याज शेख यांच्याविरुद्ध पोलिसांनी 271, 275, 3 (5) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत चौकशी करुन या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page