सोन्याचे दागिने घेऊन बोगस गोल्ड बार देऊन ज्वेलर्स व्यापार्याला गंडा
४४ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी व्यापार्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२६
मुंबई, – सोन्याचे दागिने घेऊन पन्नास ग्रॅम वजनाचे बोगस गोल्ड बार देऊन एका ज्वेलर्स व्यापार्याची दोघांनी फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शुभ गोल्ड ज्वेलर्सचा मालकासह नवीन कुरिअर कंपनीच्या कर्मचारी अशा दोघांविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सुशीलकुमार लालीचंद्र माजी हे नवी मुंबईतील नेरुळचे रहिवाशी आहे. त्यांचा मशिदबंदर येथील खोजा गल्ली, अमिना चेंबरमध्ये सोन्याच्या दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून मुंबईसह इतर शहरातील ज्वेलर्स व्यापारी दागिन्यांची मागणी करतात, अशा व्यापार्यांना ते कुरिअरच्या माध्यमातून सोन्याच्या दागिन्यांची डिलीव्हरी करतात. दागिन्यांच्या मोबदल्यात त्यांना शुद्ध सोने पाठविले जाते. गेल्या काही वर्षांपासून अशा अनेक ज्वेलर्स व्यापार्यांशी त्यांचा नियमित व्यवहार सुरु आहे. सोन्याचे दागिने बनविण्यासाठी त्यांच्याकडे दहा कारागिर असून त्यांना डिझाईनप्रमाणे दागिने बनविण्यास दिले जाते.
ऑगस्ट २०२५ रोजी अंधेरीतील सहारा हॉटेलमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे एक प्रदर्शन होते. तिथे त्यांची एका ज्वेलर्स व्यापार्याशी ओळख झाली होती. तो मूळचा जळगावचा रहिवाशी होता. तेथीलच सुभाष चौक रोड, नैनरतारा सराफा रोडवर त्याचे शुभ गोल्ड नावाचे एक ज्वेलर्स शॉप असल्याचे त्याने सुशीलकुमार यांना सांगितले होते. त्यानंतर जुलै २०२५ रोजी त्याने त्यांना कॉल करुन त्याला व्यवसायासाठी सोन्याच्या दागिन्यांची गरज असल्याचे सांगितले होते. या दागिन्यांच्या मोबदल्यात त्याने त्यांना गोल्ड बार देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना ४४ लाख रुपयांचे ३२३ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने पाठवून दिले होते.
ते दागिने त्यांनी नवीन कुरिअरच्या एका कर्मचार्याच्या मदतीने पाठविले होते. दागिने दिल्यानतर या कर्मचार्यांने त्यांना शुद्ध सोने असलेले सहा गोल्ड बार दिले होते. शॉपमध्ये आल्यानंतर त्यांना ५० ग्रॅम वजनाचे सहाही गोल्ड बार बोगस असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी नवीन कुरिअरच्या कर्मचार्यासह शुभ गोल्ड ज्वेलर्सच्या मालकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनी त्यांचे कॉल घेतले नाही. वारंवार मॅसेज करुनही त्यांनी त्यांच्या मॅसेजला प्रतिसाद दिलपा नाही. ४४ लाखांचे विविध सोन्याचे दागिने घेऊन या दोघांनी त्यांना बोगस गोल्ड बार देऊन त्यांची फसवणुक केली होती.
या घटनेनंतर त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून शुभ गोल्ड ज्वेलर्सच्या मालकासह नवीन कुरिअरचा कर्मचारी अशा दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.