वर्सोवा समुद्रकिनार्यावर सापडलेल्या अज्ञात व्यक्तीचा हत्येचा पर्दाफाश
हत्येच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या मुख्य आरोपी सहाजणांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – पंधरा दिवसांपूर्वी अंधेरीतील वर्सोवा, हिंदू स्मशानभूमीमागील समुद्रात गोणीत सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात वर्सोवा पोलिसांना यश आले आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव बसंतलाल होरीलाल रायदास (३८) असून त्याच्या हत्येप्रकरणी त्याचाच परिचित सहाजणांना वर्सोवा आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली आहे. त्यात तीन पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे. जुगाराज रामनाथ यादव, संतोष वृदावन मिश्रा, शिवम संतोष मिश्रा, मिरा संतोष मिश्रा, अंजू संतोष मिश्रा आणि वंदना संतोष मिश्रा अशी या सहाजणांची नावे असून अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. क्षुल्लक वादातून झालेल्या वादाचा सूड घेण्यासाठी आरोपींनी बसंतलालची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत जुगारामच्या अल्पवयीन मुलाचाही सहभाग उघडकीस आला असून त्याला नोटीस देऊन त्याच्या नातेवाईकाकडे सोपविण्यात आले आहे.
१ ऑक्टोंबरला अंधेरीतील वर्सोवा, हिंदू स्मशानभूमीमागील समुद्रकिनार्यावर एका गोणीत काहीतरी संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एका गोणीत ३५ ते ४० वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह गोणीत भरुन नंतर ती गोणी शिवून बंद करण्यात आली होती. ही गोणी नंतर समुद्रात फेंकून अज्ञात व्यक्तीने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. घटनास्थळाचा पंचनामा करुन तो मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. प्राथमिक तपासात या व्यक्तीची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे दिपक निकाळजे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती, त्याची ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू सापडली नाही. मृतदेहाच्या उजव्या हातावर बसंतलाल, हाताच्या बोटाच्या मागील बाजूस ओम आणि मॉ असे गोंदलेले होते. त्यामुळे या अक्षरावरुन त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. सोशल मिडीयावर संबंधित व्यक्तीची माहिती अपलोड करुन त्याच्याविषयी जास्तीत जास्त माहिती काढण्याचे काम सुरु होते. ही माहिती काढत असताना मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या गोणीचा वापर झाला होता, ती गोणी मालाड येथील अजय ट्रेडर्स दुकानातील असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे तिथे जाऊन पोलिसांनी मृत व्यक्तीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात मृत व्यक्ती लिबर्टी गार्डनच्या ओम आशिष सहकारी सोसायटीमध्ये असलेल्या अजय ट्रेडर्स या कांदा-बटाटा दुकानात काम करणारा कर्मचारी तसेच त्याचे नाव बसंतलाल रायदास असल्याचे समजले होते. मात्र ते दुकान बंद होते,
मालकासह त्याचे कुटुंबिय आणि कर्मचारी पळून गेले होते. हाच धागा पकडून वर्सोवा पोलिसांनी उत्तरप्रदेशातून जुगारामला अटक केली. चौकशीत त्यानेच इतर आरोपींच्या मदतीने बसंतलालची हत्या केल्याची कबुलीद दिली. या गुन्ह्यांत त्याला त्याव्या अल्पवयीन मुलासह तीन महिला आणि तीन पुरुष अशा सहाजणांनी मदत केली होती. या माहितीनंतर वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या इतर आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मंगळवारी हत्येनंतर पळून गेलेल्या संतोष मिश्रा, शिवम मिश्रा, मिरा मिश्रा, अंजू मिश्रा आणि वंदना मिश्रा या पाचजणांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांना पुढील कारवाईसाठी वर्सोवा पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.
हत्येच्या गुन्ह्यांत अटक होताच त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात बसंतलाल हा संतोष मिश्रा याच्याकडे भाजी विक्रीचे काम करत होता. त्याचे त्याच्याशी जुना वाद होता. या वादातून त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी त्यांनी त्याच्या हत्येची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी बसंतलालची हत्या करुन त्याचा मृतदेह एका गोणी भरला. ती गोणी शिवून ते सर्वजण अंधेरीतील वर्सोवा समुद्रकिनार्यावर आले होते. तिथेच त्यांनी गोणी फेकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मिना, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर आवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा भाग्यश्री आव्हाड वारे, पोलीस निरीक्षक अमर ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुचिता देशमुख, पोलीस उपनिरीक्षक कोळी, अमर शिंदे, प्रशांत कांबळे, विशाल दौंडकर, पोलीस हवालदार विवेक तावडे, संदीप माहडेश्वर, गणेश गागुर्डे, पांडुरंग पवार, अमीत चव्हाण, भावसार, पोलीस शिपाई किशोर सातपुते, राजेश वन्नम, प्रविण जाधव, सागर कोयंडे, विराज भोईर, मनोज काळे, मनोज परदेशी, संतोष सातवसे, अविनाश जाधव आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी केली.