गोरेगाव येथे अठरा महिन्यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ
मृत मुलीला दहा वर्षांच्या मुलीने सहाव्या फेकून दिल्याचा संशय
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – गोरेगाव येथील म्हाडा वसाहतीत एका अठरा महिन्यांच्या मुलीचा मृतदेह सापडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. आरिबा शाकीर खान असे या मृत मुलीचे नाव असून तिच्या मृत्यूप्रकरणी दिडोंशी पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. इमारतीचे सीसीटिव्ही फुटेज पलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजमध्ये मृत मुलीला एका दहा वर्षांच्या मुलीने सहाव्या मजल्यावरुन फेंकून दिल्याचा संशय आहे. त्यामुळे दिडोंशी पोलिसांकडून या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु आहे.
ही घटना बुधवारी १४ ऑक्टोंबरला रात्री साडेनऊ वाजता गोरेगाव येथील शिवशक्ती प्रकल्प क्रमांक एक इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावर खान कुटुंबिय राहत होते. शाकीर खान हे चालक म्हणून काम करत असून पंधरा दिवसांपूर्वीच ते त्यांच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते. बुधवारी त्यांची मुलगी आरिबा ही घरासमोरच खेळत होती. खेळता खेळता ती अचानक मिसिंग झाली होती. तिच्या कुटुबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. तिच्या भावाने रेलिंगवरुन खाली पाहिले असता त्याला आरिबा ही तळमजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यामुळे तो तळमजल्यावर आला.
स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्याने आरिबाला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात आरिबा ही लिफ्ट आणि पायर्यांच्या मधल्या फटीतून खाली पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती नंतर दिडोंशी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन इमारतीमधील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरिबाचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याच्या अहवालानंतर काही गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कुटुंबियांसह नातेवाईकांनी रेलिंगची पाहणी केली असता रेलिंगवरुन आरिबा पडणे शक्य नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय तिच्या कुटुंबियांनी केला आहे. एका फुटेजमध्ये तिच्याच शेजारी राहणारी दहा वर्षांची एक मुलगी पळून जाताना दिसत आहे. तिनेच आरिबाला खाली फेंकून तेथून पळ काढला होता सीसीटिव्ही फुटेजमध्ये या मुलीची हालचाल संशयास्पद दिसून येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्ररकणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.