आर्थिक वादातून अपहरण केलेल्या तरुणाला नग्न करुन बेदम मारहाण

गुन्हा दाखल होताच १२ तासांत वयोवृद्धासह अल्पवयीन मुलाला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – आर्थिक वादातून अंधेरी रेल्वे स्थानकातून अपहरण करण्यात आलेल्या २१ वर्षांच्या तरुणाला रायगडच्या उरण येथील निर्जनस्थळी आणून तिथे त्याला नग्न करुन मोबाईल व्हिडीओ काढून, लाथ्याबुक्यासह पट्ट्याने, दगडाने पाच ते सहाजणांच्या टोळीने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यात एका ६५ वर्षांच्या वयोवृद्ध आरोपी अब्दुल कादीर नसरतअली पठाण याच्यासह अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. अब्दुलला वांद्रे येथील लोकल कोर्टात सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर अल्पवयीन मुलाची डोंगरीतील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यांत सोनू ऊर्फ मेहसाद, शेहबाज ऊर्फ शिबू, मोहम्मद इस्लाम ऊर्फ जलील यांच्यासह इतर आरोपी फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अवघ्या बारा तासांत गुन्ह्यांचा छडा लावून पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे.

ही घटना गुरुवारी रात्री दहा ते सव्वादहाच्या सुमारास अंधेरी पूर्व रेल्वे स्थानकासमोरील सहार रोड, परिसरात घडली. २१ वर्षांचा तक्रारदार मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या तो त्याच्या कुटुंबियांसोबत जोगेश्‍वरीतील बेहरामबाग परिसरात राहतो. तो चालक म्हणून काम करत असून त्यातून मिळणार्‍या उत्पनातून त्याचा उदरनिर्वाह चालतो. अटक व पाहिजे आरोपी त्याच्या परिचित असून ते सर्वजण एकाच गावचे रहिवाशी आहेत. त्यांच्यात आर्थिक वाद असून या वादातून त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी दिली होती. गुरुवारी रात्री दहा वाजता तक्रारदार अंधेरी रेल्वे स्थानकासमोरुन जात होता. यावेळी तिथे आरोपी आले आणि त्यांनी त्याच्याशी त्यांच्यात सुरु असलेला आर्थिक वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. जोगेश्‍वरीतील तुझ्या घरी जाऊन तुझ्या वडिलांशी चर्चा करुन या वादावर कायमचा तोडगा काढू असे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याला एका कारमध्ये बसविले होते. त्याचे त्यांनी एका टॅक्सीसह खाजगी कारमधून अपहरण करुन त्याला जोगेश्‍वरीतील घरी न नेता रायगडच्या उरण परिसरात आणले.

निर्जनस्थळी आणल्यानंतर त्यांनी त्याला लाथ्याबुक्यांनी, पट्ट्याने, दगडाने बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावरील सर्व कपडे काढून त्याला नग्न करुन त्याचे मोबाईलवरुन व्हिडीओ बनविले. या घटनेबाबत कोणालाही काहीही सांगितले किंवा पोलिसांत तक्रार केली तर त्याचे नग्नावस्थेतील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याला सोडून ते सर्वजण पळून गेले होते. मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झाली होती. घरी आल्यानंतर त्याने घडलेला प्रकार त्याच्या कुटुंबियांना सांगितला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर त्याच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. घडलेला प्रकार अंधेरी पोलिसांना सांगून त्याने संबंधित सर्व आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणासह गंभीर दुखापत करणे, नग्नावस्थेत त्याचे व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर तो व्हिडीओ व्हायरल करणाची धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गंभीर दखल घेत अंधेरी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अतुल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन सुर्वे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पेडणेकर, पोलीस हवालदार हणमंत पुजारी, राहुल घडवले, संदीप शिंदे, विवेक म्हात्रे, मनिष कांबरी, हरिदास शिंदे, पोलीस शिपाई लोंढे, विजय पाटील, दत्ता टरके, पंडित तिघोटे आदी पथकाने तपास सुरु केला होता.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अवघ्या बारा तासांत एका वयोवृद्धासह अल्पवयीन मुलाला साकिनाका येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला. त्यानंतर अब्दुल कादीर पठाण याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. आरोपींकडून पोलिसांनी एक मोबाईल आणि गुन्ह्यांत वापरलेली पाच लाखांची कार हस्तगत केली आहे. या गुन्ह्यांत सोनू ऊर्फ मेहसाद, शेहबाज ऊर्फ शिबू, मोहम्मद इस्लाम ऊर्फ जलील यांच्यासह इतर आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page