पवईत महिलेच्या घरी नोकराकडून २३ लाखांच्या दागिन्यांवर हातसफाई
उत्तरप्रदेशचा रहिवाशी असलेल्या नोकराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – पवई परिसरात राहणार्या एका महिला व्यावसायिकाच्या घरी तिच्याच नोकराने २३ लाख ६३ हजाराच्या विविध ४२४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई केल्याची घटना उघडकीस आली आहे. राम चेलवा असे या नोकराचे नाव असून तो उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. चोरीनंतर तो उत्तरप्रदेशातील गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने पवई पोलिसांची एक टिम उत्तरप्रदेशला पाठविण्यात आली आहे.
संगीता सुशील डुंगरवाल ही महिला पवईतील हिरानंदानी गार्डन, इटर्निया अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्या पतीचा शॉपिंग मॉल कन्सल्टंटचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरी २४ तास राहणार्या एका नोकराची गरज होती. त्यासाठी तिने एका खाजगी एजन्सी कंपनीकडे विचारणा केली होती. यावेळी एजन्सीने तिच्या घरी राम चेलवा याला पाठविले होते. राम हा गावाहून मुंबई शहरात नोकरीसाठी आला होता, त्याला नोकरीची गरज होती. त्यामुळे ६ नोव्हेपासून तिने त्याला तिच्या घरी नोकरीसाठी ठेवले होते. त्याच्यासह तिच्या घरी इतर तीन महिला घरकाम करत होते. प्रत्येकावर वेगवेगळ्या कामाची जबाबदारी होती. राम चेलवा मुलाच्या जुळ्या मुलांना खूप प्रेम करत होता, तसेच तो कामात चांगला होता. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्वास बसला होता.
२३ नोव्हेंबरला तिच्या सूनेच्या नातेवाईकाचे लग्न होते, त्यामुळे डुंगरवाल कुटुंबिय लग्नासाठी राजस्थानात गेले होते. यावेळी संगीताने काही सोन्याचे दागिने स्वतजवळ तर उर्वरित दागिने कपाटातील ड्राव्हरमध्ये ठेवले होते. बुधवारी २५ नोव्हेंबरला तिचा मोठा मुलगा श्रेयांशने तिला कॉल करुन राम चेलवा हा घरी नसल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने त्याला कपाटातील सोन्याचे दागिने तपासण्यास सांगितले, त्याने कपाटातील ड्राव्हरमधील दागिन्यांची पाहणी केली असता २३ लाख ६३ हजाराचे विविध ४२४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ड्राव्हरमधून मिसिंग होते. कपाटाचा दरवाजा तुटला होता.
हा प्रकार मुलाकडून समजताच संगीता ही २६ नोव्हेंबरला मुंबईत आली होती. तिने कपाटातील दागिन्यांची पाहणी केल्यानंतर राम चेलवा याने सर्व दागिने चोरी करुन पलायन केल्याचे दिसून आले. तिने त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. तिथे त्याची बॅग नव्हती. चोरी करुन तो पळून गेल्याची खात्री होताच तिने पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राम चेलवा याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
प्राथमिक तपासात तो उत्तरप्रदेशच्या बनगाव, गौडाच्या कटरा बाजार, बरवली विकस खंडचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. चोरीनंतर तो त्याच्या गावी पळून जाण्याची शक्यता असल्याने पवई पोलिसांची एक टिम उत्तरप्रदेशला पाठविण्यात आली आहे. घरकाम म्हणून काम करताना रामने नोकरीच्या अवघ्या एकोणीसाव्या दिवसांत कपाटातील २३ लाख ६२ हजाराचे विविध सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई करुन पलायन केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.