उत्तरप्रदेशातून मुंबईत विक्रीसाठी आणलेल्या चरससह दोघांना अटक
दोन्ही आरोपींकडून १२.२० कोटीचा चरसचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – उत्तरप्रदेशातून मुंबईत विक्रीसाठी आणेलल्या चरससह दोघांना वरळी युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. मोहम्मद फैजान मेराज अहमद आणि मोहम्मद कैफ मोहम्मद शकील अशी या दोघांची नावे असून ते दोघेही उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ किलो २०० ग्रॅम वजनाचा चरसचा साठा पोलिसांनी हस्तगत केला असून त्याची किंमत बारा कोटी वीस लाख रुपये इतकी आहे. एनडीपीएस कलमांतर्गत अटकेची कारवाई केल्यानंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने शनिवार २८ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. चरसची डिलीव्हरीसाठी त्यांना सईद खान नावाच्या व्यक्तीने मुंबईत पाठविले होते, त्यामुळे त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी एक टिम उत्तरप्रदेशला गेल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा आणून त्याची विक्री केली जात होती. काही आरोपींच्या अटकेनंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच काहीजण उत्तरप्रदेशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा घेऊन मुंबई शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन पाटील यांनी वरळी ऍण्टी नारकोटीक्स सेलला आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकूंद जाधव, पोलीस हवालदार संदीप बुगडे, प्रमोद पवार, अमीत देशमुख, हणमंत येडगे, महिला पोलीस शिपाई अश्विनी गायकवाड, आशा देवकाते, पोलीस शिपाई प्रसाद गरवाड आदी पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता.
या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा कुर्ला परिसरात गस्त सुरु केली होती. ही गस्त सुरु असताना रात्री पावणेअकरा वाजता चेंबूर येथील टिळकनगर, नवीन टिळकनगर रेल व्हयू सहकारी सोसायटीसमोरील लोकमान्य टिळक टर्मिनस फ्लॉयओव्हरजवळ दोन खांद्याला काळ्या सॅक बॅग घेऊन घाईघाईने जात असताना पोलिसांना दिसले. हा प्रकार संशयास्पद वाटताच या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना १२ किलो २०० ग्रॅम वजनाचे चरस सापडले. या चरसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात बारा कोटी वीस लाख रुपये इतकी आहे. चौकशीत ते दोघेही उत्तरप्रदेशातील कानपूरचे रहिवाशी असून ते चरसची विक्रीसाठी उत्तरप्रदेशातून मुंबईत शहरात आले होते. त्यांना ते चरस त्यांच्या एका मित्राने दिले होते.
यातील मोहम्मद फैजानचे बारावीपर्यंत तर मोहम्मद कैफचे पहिलीपर्यंत शिक्षण झाले आहे. चरसचा साठा हस्तगत करुन या दोघांनाही नंतर वरळी येथील कार्यालयात आणण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांना शनिवार २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सईद खान याचे नाव समोर आले असून तो उत्तरप्रदेशातील कानूपर, उरईचा रहिवाशी आहे. त्यानेच त्यांना चरसच्या डिलीव्हरीसाठी मुंबईत पाठविले होते. त्याचे मुंबईत काही सहकारी असून या सहकार्यांच्या मदतीने त्यांचा चरस विक्रीची योजना होती. मात्र मोहम्मद फैजान आणि मोहम्मद कैफ पकडले गेल्याने त्याची योजना फसली गेली आहे.