चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची पतीकडून गळ्यावर वार करुन हत्या

धारावीतील घटना; पळून गेलेल्या पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – चारित्र्याच्या संशयावरुन दिपा मारुती रसाळ या महिलेची तिच्याच पतीने गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना धारावी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पती मारुती हरिश्‍चंद्र रसाळ याच्याविरुद्ध धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

ही घटना गुरुवारी २६ जानेवारीला रात्री साडेनऊ वाजता धारावीतील बीएमसी कमला नेहरु नगरात घडली. लक्ष्मी अक्षय देशमाने ही नर्स असून ती तिच्या कुटुंबियांसोबत ठाण्यातील सावरकरनगर, अवधूत सोसायटीमध्ये राहते. दिपा ही तिची बहिण असून ती सध्या बीएमसी कमला नेहरु नगर येथे राहत होती. मारुती रसाळ हा तिचा पती असून तो तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांच्यात याच कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले होते.

या भांडणानंतर त्याने तिची धारदार हत्याराने गळ्यावर वार केले होते. त्यात दिपा ही गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी दिपाची बहिण लक्ष्मी देशमाने हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.

या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पती मारुती रसाळ याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर तो पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page