कस्टमर सपोर्टची एपीके फाईल पाठवून गंडा घालणारे त्रिकुट गजाआड

बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार करुन २४.५० लाखांची फसवणुक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – कस्टमर सपोर्टची मोबाईलवर एपीके फाईल पाठवून गंडा घालणार्‍या एका त्रिकुटाला पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आरिफ अन्सारी, नौशाद शेख आणि मोहम्मद मेहबूब आलम अशी तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. या तिघांनी गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांच्या मदतीने एका वयोवृद्धाच्या बँक खात्यातून सात ऑनलाईन व्यवहार करुन २४ लाख ५० हजाराची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यासाठी या तिघांनी सायबर ठगांना बँक खात्याची डिटेल्स पुरविल्याचा आरोप आहे.

रियाज मोईज हलीम हे ७९ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार सांताक्रुज येथे राहतात. १ नोव्हेंबरला ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांच्या मोबाईलवर बँकेचा एक मॅसेज आला होता. त्यात त्यांच्या बँक खात्यातून काही रक्कम डेबीट झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या ऑनलाईन व्यवहाराशी त्यांचा काहीही संबंध नव्हता, त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहितीसह कुठलाही पासवर्ड कोणालाही शेअर केला नव्हता. तरीही त्यांच्या बँक खात्यातून २४ लाख ५० हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचा पुतण्या मुश्कर हलीमला ही माहिती सांगितली. त्याने त्यांच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यात त्याला एका अज्ञात व्यक्तीने त्यांना कस्टमर सपोर्ट नावाची एक एपीके फाईल पाठविली होती.

ही फाईन त्यांच्याकडून ओपन झाली होती. त्यानंतर ३० ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सात ऑनलाईन व्यवहार झाले होते. या व्यवहारातून त्यांच्या खात्यातून २४ लाख ५० हजार रुपये डेबीट झाले होते. घडलेला प्रकार मुश्कर हलीमने त्यांन सांगितला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता.

ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या सर्व बँक खात्यासह खातेदाराची माहिती काढण्यात आली होती. तांत्रिक माहितीवरुन आरिफ अन्सारी, नौशाद शेख आणि मेहबूब आलम या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला आहे. फसवणुकीची रक्कम त्यांच्याच बँक खात्यात जमा झाली होती. त्यांनी सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page