जेवणासाठी पैसे मागितले म्हणून भावावर चाकूने हल्ला

हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत भावाला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – जेवणासाठी पैसे मागितले म्हणून चुलत भावावर त्याच्याच भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भायखळा रेल्वे स्थानकाजवळील फुटपाथवर घडली. या हल्ल्यात मोहम्मद जमील मोहम्मद सुल्तान मुमताज अन्सारी हा जखमी झाल्याने त्याच्यावर नायर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक ओषधोपचार करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपी भाऊ मोहम्मद मुस्ताक मुमताज अन्सारी याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

मोहम्मद जमील हा भायखळा येथे राहत असून त्याची पत्नी बिहार येथील गावी राहते. तो मजुरीचे काम करुन स्वतचा उदरनिर्वाह चालवत होता. मोहम्मद मुस्ताक हा त्याचा चुलत भाऊ असून आग्रीपाडा परिसरात राहतो. तो भायखळा रेल्वे स्थानकात आंबा, चिंच विक्री करतो. मंगळवारी रात्री आठ वाजता तो मुस्ताककडे गेला होता, यावेळी त्याने त्याच्याकडे जेवणासाठी पैसे मागितले. यावेळी त्याने त्याला पैसे देण्यास नकार दिला. तसेच त्याला तिथे पुन्हा येऊ नकोस असा दम दिला होता. त्याने त्याच्याकडे पुन्हा जेवणासाठी पैशांची मागणी केल्यानंतर तो प्रचंड संतापला आणि त्याने आंबा कापण्याच्या चाकूने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती.

हा प्रकार त्याच्या मित्राच्या निदर्शनास येताच त्याने जखमी झालेल्या जमीलला तातडीने मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर प्राथमिक ओषधोपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आले. या घटनेनंतर त्याने आग्रीपाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्या चुलत भावाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोहम्मद मुस्ताक याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर मोहम्मद मुस्ताकला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page