पवई येथे क्षुल्लक वादातून सहकारी कर्मचार्याची हत्या
हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी सहकार्याला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२६
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून सहकारी कर्मचार्याची त्याच्याच मित्राने मारहाणीसह स्लायडिंग काचेवर धक्का देऊन हत्या केल्याची घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. फेकान भुलाई महतो असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव असून हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपी सहकार्याला काही तासांत पवई पोलिसांनी अटक केली. अजीत भोला महतो असे या २४ वर्षांच्या आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना पवईतील चांदीवली, आईस फॅक्टरीच्या मागील पंकज इमारतीच्या टेरेसवरील कॅण्टीनमध्ये घडली. प्रितेशकुमार प्रेम महतो हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून सध्या तो पंकज इमारतीच्या टेरेस कॅण्टीनमध्ये आचारी म्हणून काम करतो. याच ठिकाणी मृत फेकान आणि आरोपी अजीत महतो हे दोघेही कामाला असून ते तिघेही बिहारचे रहिवाशी आहेत. कामानिमित्त ते तिघेही गेल्या काही वर्षांपासून तिथे आले होते. काम संपल्यानंतर ते तिथेच झोपत होते. शनिवारी रात्री साडेदहा वाजता फेकान आणि अजीत यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.
प्रकरण वाढू नये म्हणून प्रितेशकुमारने त्यांच्या भांडणात मध्यस्थी करुन दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र समजूत काढूनही त्यांच्यात वाद मिटत नव्हता. याच दरम्यान अजीतने फेकानला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात स्लायडिंगची काच फुटली आणि त्याने त्याच काचेच्या दिशेने त्याला जोरात धक्का बसला होता. या घटनेत फेकान हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना फेकान महतो याचा मृत्यू झाला होता. ही माहिती प्राप्त होताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी प्रितेशकुमारची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याव्या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अजीत महतो याच्याविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अजीत महतो याला रविवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.