हेव्ही डिपॉझिटच्या तेरा लाखांचा अपहार करुन फसवणुक
एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२६
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटसाठी घेतलेल्या सुमारे तेरा लाखांचा अपहार करुन एका महिलेची फसवणुक झाल्याचा प्रकार ताडदेव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध ताडदेव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कृतिका विपुल जाधव, विपुल रमेश जाधव, दिनेश बारिया आणि गीता जाधव अशी या चौघांची नावे आहेत. या चारही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
नयना नरेश वनेल ही महिला ताडदेवच्या तुळशीवाडी परिसरात राहते. तिचे पती महानगरपालिकेतील घनकचरा विभागात कामाला आहे. ती कृतिकाला लहानपणापासून ओळखत असून पूर्वी त्या दोघीही आर्थर रोडजवळ राहत होते. ऑगस्ट २०२३ साली तिने तिला तुळशीवाडी परिसरात एक रुम विकत घेत असून तो रुम तिला हेव्ही डिपॉझिटमध्ये भाड्याने राहण्यासाठी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी तिने तिच्याकडे अकरा लाखांची आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. नयना हिला भाड्याच्या रुमची गरज होती, त्यामुळे तिने तिला रुम घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे तिने तिचे काही दागिने गहाण ठेवून तिल ८ लाख ७० हजार रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर तिने तिला रुम भाड्याने देण्याची विनंती करताना तिला उर्वरित रक्कम टप्याटप्याने देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र काही दिवस उलटूनही कृतिकाने नवीन रुम घेतला नाही. विचारणा केल्यानंतर तिने तिचा पती आजारी असून त्याच्याच औषधोपचारात पैसे खर्च झाल्याचे सांगितले. तिला रुमसाठी काही रक्कम कमी पडत आहे असे सांगून तिच्याकडून पुन्हा पैशांची मागणी सुरु केली होती. त्यामुळे तिने तिला ४ लाख ६५ हजार ५०० रुपये दिले होते. ३० मे २०२५ रोजी कृतिकाने तिचा पती विपुल, सासरे दिनेश आणि सासू गिता यांच्यासमोर तिच्यासोबत एक करार करुन तिने तुळशीवाडी येथे एक रुम घेतला आहे. हा रुमला तिला तीन वर्षांसाठी हेव्ही डिपॉझिटवर देत असल्याचे नमूद केले होते. यावेळी त्यांनी तिला दोन महिन्यांत रुमचा ताबा देण्याचे मान्य केले होते.
मात्र एक वर्ष उलटूनही त्यांनी तिला रुमचा ताबा दिला नाही किंवा हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतलेले १३ लाख ३२ लाख ५०० रुपये परत केले नाही. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. वारंवार विचारणा करुनही त्यांच्याकडून तिला प्रतिसाद मिळत नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने कृतिकासह तिच्या कुटुुंबियांविरुद्ध ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कृतिका जाधव, विपुल जाधव, दिनेश बारिया आणि गीता जाधव या चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी हेव्ही डिपॉझिटच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.