फसवणुकीसाठी सायबर ठगांना मदत करणार्या त्रिकुटास अटक
गुंतवणुकीच्या बहाण्याने वयोवृद्धाला ६५ लाखाचा घातला गंडा
अरुण सावरटकर
१३ जुलै २०२६
मुंबई, – चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक करणार्या सायबर ठगांना मदत करणार्या एका टोळीचा उत्तर प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीशी संबंधित असलेल्या एका त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली असून या तिघांनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रंजित राजकुमार रांका, सनी हैदरअली अमन आणि पारस संतोष शर्मा अशी या तिघांची नावे आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत आहे. गुंतवणुकीच्या बहाण्याने या टोळीने एका वयोवृद्धाला ६५ लाखांना गंडा घातला होता, फसवणुकीची ही रक्कम याच आरोपींच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यांनी उघडलेल्या बँक खात्यात इतर फसवणुकीच्या गुन्ह्यांतील लाखो रुपये जमा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
६५ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार बोरिवली परिसरात राहत असून ते कार्गो विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यांचे एक डिमॅट खाते असून ते अधूनमधून शेअर ट्रेडिंग करतात. याबाबत त्यांना चांगली माहिती आहे. मार्च महिन्यांत त्यांना सोशल मिडीयावर मोतीलाल ओसवाल कंपनीची एक जाहिरात दिसली होती. ती लिंक ओपन केल्यानंतर त्यांना मोतीलाल ओसवाल फायनान्स सर्व्हिस व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांना सुरेखा नावाच्या महिलेने कॉल करुन त्यांचे ग्रुपमध्ये स्वागत केले. तिने ती कंपनीत फायनाशियल सहाय्यक म्हणून काम करत असल्याचे सांगितले. कंपनीच्या माध्यमातून विविध शेअरमध्ये गुंतवणुक केली जात असून या गुंतवणुकीना त्यांच्या सभासदांना चांगला परतावा देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असते. तिने त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना ट्रेडिंगचे अकाऊंट ओपन करण्यासाठी एक लिंक पाठविली होती.
ही लिंक ओपन करुन त्यांनी त्यांचे कंपनीचे ट्रेडिंग अकाऊंट सुरु केले होते. याच दरम्यान तिने विविध शेअरमध्ये गुंतवणुकदारांना किती फायदा होतो याची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. मदत करण्याची बतावणी करुन सुरेखाने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्याची माहिती देऊन त्या बँक खात्यात त्यांना पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी मार्च ते एप्रिल २०२६ या कालावधीत विविध शेअरमध्ये ६५ लाख ८० हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणकीवर त्यांना प्रचंड फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनी दोन वेळा काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पाठविण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर त्यांच्या बँक खात्यात एक लाख रुपये ट्रान्स्फर करण्यात आले होते.
मात्र काही दिवसांनी संबंधित ग्रुप अचानक बंद करण्यात आला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी सुरेखाला संपर्क साधला होता, मात्र तिने त्यांना प्रतिसाद दिला नाही. तिने त्यांचा मोबाईल ब्लॉक केला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार सायबर सेल पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ६५ लाख ८० हजाराची रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या सर्व बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढून संंबंधिताच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी रंजित रांका, सनी अमन आणि पारस शर्मा या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.
तपासात या तिघांच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले होते. फसवणुकीसाठी सायबर ठगांना या तिघांनी बँक खाती पुरविले होते. खात्यात जमा झालेली रक्कम नंतर सायबर ठगांना देण्यात आली होती. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.