सोन्याच्या दागिन्यांच्या फसवणुकीप्रकरणी मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

एमसीएक्समध्ये ५.८० कोटीचे सोन्याचे हरल्याची मॅनेजरची कबुली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जुलै २०२६
मुंबई, – कोट्यवधी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या फसवणुकीप्रकरणी मितेश प्रविण कोठारी या कंपनीच्या मॅनेजरविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एमसीएक्समध्ये मितेशने गेल्या एक वर्षांत ५ कोटी ८० लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने हरल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. कंपनीची विश्‍वासाने जबाबदारी सोपविलेल्या मॅनेजरने ५.८० कोटीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने कंपनीतील इतर अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

प्रभादेवी येथील रहिवाशी असलेले विनित नवरतन राणावत हे ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा सोने-चांदी खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्यांची स्वतची संघवी धनरुपती देवाजी ऍण्ड नावाची एक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबादेवी येथील दागिना बाजार परिसरात आहे. १९०५ साली त्यांच्या कुटुंबियांनी ही कंपनी सुरु केली होती. मितेश हा त्यांच्याकडे गेल्या पंधरा वर्षांपासून मॅनेजरचे काम पाहत होता. अत्यंत विश्‍वास कर्मचारी म्हणून त्याची ओळख होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे कार्यालयासह तिजोरीची चावी तसेच अकाऊंटसह सोने-चांदी खरेदी-विक्रीचे सर्व अधिकारी दिले होते. गेल्या काही वर्षांत त्याने काही ज्वेलर्स व्यापार्‍यांना विविध सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली होती. मात्र या दागिन्यांचे पेमेंट कंपनीला मिळाले नव्हते.

याबाबत कंपनीकडून ऑडिट करण्यात आले होते. त्यात कंपनीत ५ कोटी ८० लाख ६ किलो १२९ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिन्यांचे पेमेंट बाकी असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे विनित राणावत यांनी कंपनीतील सर्व कर्मचार्‍यांची एक मिटींग घेऊन याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मितेशने या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याची कबुली देताना पोलिसांत तक्रार करु नका अशी अशी विनंती केली होती. चौकशीनंतर त्याच्या मोबाईलमध्ये सुशील पारेख आणि वंश जोगाणी यांचे मोबाईल क्रमांक सापडले. तो त्यांच्या संपर्कात होता. त्यांच्याशी त्याचे अनेकदा आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले होते.

गेल्या एक वर्षांत त्याने कंपनीतून थोडे थोडे करुन सोने बाहेर काढले होते, ते सोने तो एमसीएक्समध्ये हरला होता. या एमसीएक्सचे मालक सुशिल पारेख असून त्यांच्याकडे त्याने ते दागिने दिले होते. याबाबत सुशील पारेख, वंश जोगाणी आणि मितेशचे वडिल प्रविण कोठारी यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी मितेशने विविध सोन्याचा अपहार करुन कंपनीची ५.८० कोटींची फसवणुक केल्याचे सांगितले.

त्याने एप्रिल २०२५ ते जून २०२६ या कालावधीत विविध ज्वेलर्स व्यापार्‍यांना दिलेला माल त्यांना न देता त्याचा परस्पर अपहार केल्याची कबुली दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विनित राणावत यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कंपनीचा मॅनेजर मितेश कोठारीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page