अमेरिकन डॉलरची बतावणी करुन गंडा घालणार्या टोळीचा पर्दाफाश
सहाजणांना अटक करुन तीन गुन्ह्यांची उकल करण्यात यश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 ऑक्टोंबर 2025
नवी मुंबई, – स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याची बतावणी करुन अनेकांना गंडा घालणार्या एका टोळीचा रबाळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत मुख्य आरोपीसह सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद राहुल लुकमान शेख, खोसमुद्दीन मोहम्मद शेख ऊर्फ येलीम, रिंकू अबूताहीर शेख, रोहिम बकसर शेख, अजीजुर रेहमान सादिक आणि आलमगीर आलम सुखखू शेख अशी या सहाजणांची नावे असून ते सर्वजण मुंब्रा-कौसा, दो मटका चाळीतील रहिवाशी आहेत. या आरोपींच्या अटकेने रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर या सहाही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोहम्मद आफ्रीफी सिद्धीकी हे कांदिवली परिसरात राहतात. गेल्या आठवड्यात त्यांना अज्ञात व्यक्तीने कॉल करुन स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी त्यांना अमेरिकन डॉलरसाठी ऑनलाईन तीन लाख रुपये पाठविले होते. मात्र अमेरिकन डॉलर न पाठविता या टोळीने त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी रबाळे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रबाळे पोलीस ठाण्यात अशाच इतर काही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यामुळे त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश पोलिसांना दिले होते.
या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक बनसोडे, सचिन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात, पोलीस हवालदार दर्शन कटके, मयुर सोनावणे, पोलीस नाईक गणेश वीर, धनाजी भांगरे, मनोज देडे यांनी तपास सुरु केला होता. मोबाईल सीडीआर, सीसीटिव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मुंब्रा येथील शिळफाटा परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून सहाजणांच्या टोळीला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यांच्या चौकशीतून रबाळे पोलीस ठाण्याच्या तीन फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. ते सर्वजण मुंब्रा येथे राहत असून फसवणुकीसाठी त्यांनी एक टोळी तयार केली होती. त्यांनी अनेकांना अमेरिकन डॉलर देऊन त्यांच्याकडून पैसे उकाळून त्यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर सहाही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अशाच इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.