प्रेमसंबंधास नकार दिला म्हणून महिलेची हत्या करुन जाळून टाकले

हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 मे 2026
भिवंडी, – प्रेमसंबंध ठेवत नाही, फोनवर बोलत नाही म्हणून रागाच्या भरात एका 33 वर्षांच्या महिलेची तिच्याच परिचित आरोपीने हत्या करुन तिचा मृतदेह जाळून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस भिवंडी घटक क्रमांक दोनच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. द्वारकाप्रसाद गिरीधारीप्रसाद वर्मा ऊर्फ संजय मुकादम असे या 42 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला भिवंडी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

12 मेला भिवंडीतील पद्दमानगर, दुर्गा प्रसाद हॉटेलजवळील मैदानात एका महिलेचा मृतदेह भिवंडी शहर पोलिसांना सापडला होता. या महिलेची हत्या करुन अज्ञात मारेकर्‍याने तिचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. महिलेची ओळख पटू नये, हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा अज्ञात मारेकर्‍याचा हेतू होता. घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केल्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह भिवंडी घटक क्रमांक दोनचे गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. हत्येनंतर मारेकर्‍याने कुठलाही पुरावा ठेवला नव्हता. तरीही पोलिसांनी परिसरातील पावरलुम कारखाना आणि दाट कामगार वस्तीमध्ये चौकशी सुरु केली होती.

गुप्त बातमीदारासह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी द्वारकाप्रसाद वर्मा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने या महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. मृत महिलेचे नाव सरीतादेवी विकास महतो असल्याचे उघडकीस आले होते. ती आरोपी संजय मुकादमशी परिचित असून त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवत नाही, फोनवरुन बोलत नाही याचा त्याला राग होता. त्यामुळे 11 मेला दुपारी दोन वाजता त्याने तिला त्याच्या घरी आणले होते. तिथेच त्याने तिचा मोबाईल मागितला, मात्र तिने तिचा मोबाईल देण्यास नकार दिला. या कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून त्याने तिची हत्या केली.

तिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पोत्यामध्ये भरला आणि रात्रीच्या वेळेस तिचा मृतदेह दुर्गा प्रसाद हॉटेलजवळील मैदानात आणून तिला जाळून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या हत्येनंतर तो तेथून पळून गेला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला भिवंडी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, राजेश शिंदे, रामचंद्र जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार निलेश बोरसे, साबीर शेख, सुदेश घाग, प्रशांत राणे, प्रकाश पाटील, वसंत चौरे, रंगनाथ पाटील, वामन भोईर, किशोर थोरात, शिवाजी मुर्तडक, पोलीस शिपाई विजय कुंभार, नितीन नंदीवाले, सर्फराज तडवी, रविंद्र साळुंखे, महिला पोलीस हवालदार माया डोंगरे, अनुष्का पाटील, दक्षता सुतार, सायली गंभेरा यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page