बोगस दस्तावेज सादर करुन सव्वातीन कोटीचे कर्ज काढून फसवणुक
कंपनीच्या दोन संचालकासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ जुलै २०२६
मुंबई, – सोसायटीचे बोगस एनओसीचे दस्तावेज सादर करुन एका खाजगी बँकेतून कर्ज काढून व्यावसायिकाची तीनजणांच्या टोळीने सुमारे सव्वातीन कोटीची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या दोन संचालकासह तिघांविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद यादव, प्रकाश घाटे आणि हुसैन हैदर अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या तिघांनी अशा प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
कुणाल देव भद्रा हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत माटुंगा परिसरात राहतात. त्यांची स्वतची खाजगी कंपनी असून या कंपनीत ते मुख्य संचालक म्हणून काम पाहतात. २००९ साली त्यांनी मुलुंडच्या एलबीएस रोडवरील झिरकॉन सोसायटीच्या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये गुंतवणुक केली होती. तीन वर्षांपूर्वी त्यांना बिल्डरकडून फ्लॅटचा ताबा देण्यात आला होता. त्यांना मालाड येथे एक फ्लॅट घ्यायचा होता, या इमारतीला मनपाकडून ओसी प्राप्त झाली नव्हती, त्यामुळे त्यांना फ्लॅटवर कर्ज काढता येत नव्हते. अखेर त्यांनी मुलुंडच्या फ्लॅटची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांच्या मित्राने त्यांची ओळख प्रकाश घाटेशी करुन दिली होती. त्याने त्यांना प्रमोद यादव आणि हुसैन हैदर यांच्याविषयी माहिती दिली होती.
त्यांची एक खाजगी कंपनी असून ते दोघेही कंपनीचे संचालक आहे. त्यांच्या कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार तोच पाहत असल्याचे सांगितले. त्यांना व्यवसायासाठी कर्जाची गरज आहे. प्रॉपटीवर कर्ज मिळत असल्याने त्याने त्यांना फ्लॅट विक्रीचा सल्ला दिला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी प्रमोद आणि हुसैन यांच्यासात फ्लॅटचा व्यवहार सुरु केला होता. चर्चेअंती त्यांच्यात सव्वातीन कोटींमध्ये फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरला होता. यावेळी या दोघांनी फ्लॅटवर कर्ज काढणार असून कर्जाची रक्कम मिळाल्यानंतर त्यांना सर्व रक्कम एकाच वेळेस देण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रमोदने त्यांना ५० लाख रुपये देण्याची विनंती केली होती. ही रक्कम ते दोघेही कर्ज काढून त्यांना परत करतील असे सांगितले.
त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना ५० लाखांचे पेमेंट केले होते. फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी एका खाजगी बँकेतून व्यवसायासाठी कर्ज मंजूर झाल्याचे पत्र दाखविले होते. त्यासाठी त्यांना फ्लॅटचे मूळ दस्तावेज तसेच सोसायटीची एनओसीची गरज होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना फ्लॅटचे मूळ दस्तावेज आणि सोसायटीची एनसीओ दिली होती. त्यानंतर त्यांच्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा करार झाले होते. कुर्ला येथील सब रजिस्ट्रर कार्यालयात तशी नोंद करण्यात आली होती. यावेळी त्यांनी सव्वातीन कोटीचा व्यवहार झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांत त्यांनी त्यांना सव्वातीन कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले,
मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी फ्लॅटची सव्वातीन कोटीची रक्कम दिली नाही. ते तिघेही वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. १ जानेवारी २०२५ रोजी त्यांना त्यांच्या सोसायटीच्या पदाधिकार्यानी कॉल करुन खाजगी कंपनीचे अधिकारी त्यांच्या फ्लॅटचा ताबाा घेण्यासाठी आल्याचे सांगितले. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे ते तिथे गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना संबंधित अधिकार्यांनी प्रमोद यादव, प्रकाश घाटे आणि हुसैन हैदर यांनी त्यांच्या फ्लॅटवर सव्वादोन कोटीचे कर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांनी फ्लॅट बँकेत तारण म्हणून ठेवले होते, मात्र कर्ज मिळाल्यानंतर त्यांनी त्याचे नियमित हप्ते भरले नाही. त्यामुळे बँकेने फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली आहे.
यावेळी त्याने बँकेत सादर केलेले काही दस्तावेज बोगस असल्याचे त्याच्या लक्षात आले. या तिघांनी फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्यांच्या फ्लॅटचे दस्तावेज प्राप्त करुन बॅकेतून कर्ज काढून त्यांच्यासह बँकेची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मुलुंड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रमोद यादव, प्रकाश घाटे आणि हुसैन हैदर यांच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन सव्वातीन कोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहै.