खरेदी-विक्री केलेल्या फ्लॅटची विक्री करुन महिलेची फसवणुक
32 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 मे 2026
मुंबई, – आठ वर्षांपूर्वी खरेदी-विक्री केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री करुन एका व्यावसायिक महिलेची तिघांनी सुमारे 32 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार धारावी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध धारावी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राजाराम अलकू जैस्वार, शिवशंकर दुबे आणि राजश्री दिनेश त्रिपाठी अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोिलिसांनी सांगितले.
लक्ष्मी ज्ञानेश्वर व्हनकळस ही महिला धारावी परिसरात राहत असून तिचा चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. 2009 ते 2018 साली ती तिच्या मुलांसोबत कल्पतरु सोसायटीच्या एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. याच सोसायटीमध्ये राजश्री हिने तिला नऊ लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर एक फ्लॅट दाखविला होता. त्यामुळे मार्च 2018 रोजी तिने राजश्रीकडून कल्पतरु सोसायटीच्या दुसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 212 हेव्ही डिपॉझिटवर घेतला होता. त्यासाठी तिने राजश्रीला नऊ लाख रुपये दिले होते. ऑगस्ट महिन्यांत राजश्रीला पोटाचा आजार झाल्याने तिला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने तिचा रुम विक्रीचा निर्णय घेतला होता.
याबाबत तिने लक्ष्मीला विचारणा केली होती. तिने होकार दर्शविल्यानंतर त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा 32 लाखांमध्ये व्यवहार ठरला होता. सप्टेंबर 2018 रोजी तिने रजिस्ट्रर नोटरीद्वारे रुम तिच्या नावावर करुन घेतला होता. तिने तिला हेव्ही डिपॉझिट म्हणून नऊ लाख रुपये दिले होते. काही दिवसांत उर्वरित कॅश आणि ऑनलाईन पेमेंट करुन तिने तिला 32 लाखांचे पेमेंट केले होते. याच दरम्यान लक्ष्मीला 212 क्रमांकाचा फ्लॅट राजश्रीने राजाराम जैस्वारकडून विकत घेतला होता. त्याच्यासोबत फ्लॅटचा संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्याचे तिने सांगितले होते. याबाबत तिने काही कागदपत्रे दाखवून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून लक्ष्मीने तिच्यासोबत फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता.
या व्यवहाराबाबत सोसायटीचे सेक्रेटरी शिवशंकर दुबे यांना माहित होते. या घटनेला एक महिना होत नाहीतर तोवर लक्ष्मीला तोच फ्लॅट राजश्री आणि राजारामने सोसायटीचे शिवशंकर यांच्या मदतीने राजेंद्र मिश्रा या व्यक्तीला परस्पर विक्री केल्याची माहिती समजली होती. त्यामुळे तिच्या मुलाने वरळीतील सहदुय्यम निबंधक कार्यालयातून फ्लॅटचे कागदपत्रे मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात 13 मे 2023 रोजी राजारामने राजेंद्रला फ्लॅटची विक्री केली होती. या व्यवहारात राजश्री आणि जोसेफ मिस्त्री या दोघांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केलही होती. अशा प्रकारे राजश्रीने तिच्याशी फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फ्लॅटसाठी 32 लाख रुपयांचे पेमेंट घेतले,
मात्र या फ्लॅटची परस्पर राजेंद्र मिश्राशी व्यवहार करुन तिची फसवणुक केली होती. राजश्री, राजाराम आणि शिवशंकर यांनी संगनमत करुन फ्लॅटच्या पैशांचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने तिघांविरुद्ध धारावी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राजाराम जैस्वार, शिवशंकर दुबे आणि राजश्री त्रिपाठी या तिघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची पोलिसांकडून लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.