घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक
२१ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल तर ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जून २०२६
ठाणे, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा घटक क्रमांक तीनच्या अधिकार्यांनी अटक केली. राजेश अरविंद राजभर असे या ३० वर्षीय गुन्हेगाराचे नाव असून त्याच्या अटकेने २१ हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील ३८ लाख ५० हजार रुपयांचे विविध सोन्या-चांदीचे दागिने कॅश असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. हा मुद्देमाल त्याने त्याच्या पहिल्या पत्नीसह भावाच्या घरी ठेवून तो उत्तरप्रदेशला पळून गेला होता, अखेर त्याला उत्तरप्रदेशातील त्याच्या गावातून पोलिसांनी अटक केली.
गेल्या काही महिन्यांत ठाणे आणि आसपासच्या परिसरात दिवसा आणि रात्रीच्या घरफोडीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. याबाबत विविध पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. घरफोडीच्या वाढत्या घटनेची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासासह या गुन्ह्यांतील आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, पोलीस हवालदार विजय जिरे, पांडुरंग भांगरे, सुधीर कदम, सचिन भालेराव, विलास कडू, सचिन कदम, आदिक जाधव, गोरक्षनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंडारे, पोलीस नाईक दिपक महाजन, प्रविण किनरे, पोलीस शिपाई सतीश सोनावणे, गुरुनाथ जरंग, मिथुन राठोड, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, जालिंदर साळुंखे, महिला पोलीस शिपाई मंगल गावीत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोरकर आदींनी संबंधित आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांना एक संशयित व्यक्तीला दिसून आला होता. या व्यक्तीची माहिती काढताना तो काही दिवसांपूर्वीच त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर त्याच्या अटकेसाठी एक टिम उत्तरप्रदेशात पाठविण्यात आली होती. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने उत्तरप्रदेशातील आजमगढ येथे लपलेल्य राजेश राजभर याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत तो घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले.
त्याच्याविरुद्ध रायगड, ठाणे, ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात ३३ हून अधिक घरफोडीची नोंद असून त्याच्या अटकेने २१ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली होती. त्यात मानपाडा, विष्णूनगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी तीन, नालासोपारा, कोळसेवाडी, टिळकनगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, नौपाडा, कोपरी, उरण, कल्याण तालुका खडकपाडा, बदलापूर, कळवा, मुंब्रा, नारपोली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा एकवीस घरफोडीच्या गुन्ह्यांचा समावेश होता.
या गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल त्याने त्याच्या पहिल्या पत्नीसह भाऊ राकेश अरविंद राजभर याच्याकडे ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने या दोघांच्या घरी छापा टाकला होता. या दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी विविध सोन्या-चांदीचे दागिने आणि कॅश असा ३८ लाख ५० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.