चोरीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपी महिलांचे लॉकअपमधून पलायन
एका महिलेला अटक करण्यात यश तर दुसर्या महिलेचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२५ं
नवी मुंबई, – जुईननगर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेच्या गोदामातून ओव्हरहेड इलेट्रीक वायर चोरी केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या दोन आरोपी महिलांनी आरपीएफच्या बेलापूर पोलीस ठाण्यातील लॉकअपमधून पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुपाली कैलास कुर्हाडे आणि शालिबाई अशोक पवार अशी या दोघींची नावे आहेत. याप्रकरणी पनवेल पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच काही तासांत रुपालीला नेरुळ रेल्वे स्थानकातून रेल्वे पोलिसांनी अटक केली तर शालिबाई हिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तिच्या अटकेसाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मिलापसिंग परते मूळचे मध्यप्रदेश बालघाट, जैरासीचे रहिवाशी असून रेल्वे पोलीस बलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या त्यांची नियुक्ती बेलापूर पोलीस ठाण्यात आहे. २१ सप्टेंबरला जुईनगर रेल्वे स्थानकाजवळील गोदामातून ओव्हरहेड इलेक्ट्रीक वायर चोरीची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. याप्रकरणी एसएससी विभागाचे रविकांत गाडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेश मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना शनिवारी २६ सप्टेंबरला दोन संशयित महिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांचे नावे रुपाली कुल्हाडे आणि शालिबाई पवार असल्याचे उघडकीस आले. रुपाली ही जालनाच्या परतूर, रायगव्हाण तर शालिबाई ठाण्याच्या कावात, हनुमान मंदिरजवळील धुमाळपाड्याची रहिवाशी होती. तपासादरम्यान त्यांनी ओव्हरहेड इलेक्ट्रीक वायरची चोरी केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर रविवारी २७ सप्टेंबरला या दोन्ही महिलांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना मुंबई सेंट्रल येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांनपा बुधवार ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी सुनावल्यानंतर या दोघींना बेलापूर पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.
रात्री तिथे सहाय्यक फौजदार राजीव परसन आणि महिला पोलीस हवालदार पूजा बागरे यांची ड्युटी होती. सकाळी पावणेसात पूजा या बाथरुममध्ये गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेऊन रुपाली आणि शिलाबाई या लॉकअपमधून पळून गेले होते. हा प्रकार तिथे उपस्थित रेल्वे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मिलापसिंग परते यांना ही माहिती दिली होती. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना दोन्ही महिलांच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर रेल्वे पोलिसांच्या दोन ते तीन विशेष पथकाने आरोपी महिलांचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना रुपाली कुर्हाडे हिला काही तासांत नेरुळ रेल्वे स्थानकातून पोलिसांनी ताब्यात घेतले. ती नेरुळ रेल्वे स्थानकातून तिच्या जालना येथील गावी पळून जाण्याच्या तयारीत होती. मात्र त्यापूर्वीच तिला पोलिसांनी अटक केली. शालिबाई ही पळून जाण्यात यशस्वी झाली असून तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याप्रकरणी मिलापसिंग परते यांच्या तक्रारीवरुन रुपाली कुर्हाडे आणि शालिबाई पवार यांच्याविरुद्ध पनवेल रेल्वे पोलिसांनी कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.