कौटुंबिक वादातून ६२ वर्षांच्या जन्मदात्या वयोवृद्ध आईची मुलाकडून हत्या
हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांत अटकेत असलेल्या मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – कौटुंबिक वादातून आजारी असलेल्या साधना भोलेनाथ कारंडे या ६२ वर्षांच्या जन्मदात्या वयोवृद्ध आईची तिच्यच मुलाने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या साधना हिचा जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अभिषेक भोलेनाथ कारंडे या २८ वर्षांच्या आरोपी मुलाला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध आधी हत्येच्या प्रयत्नाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता, आता त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना सोमवारी ९ नोव्हेंबरला सायंकाळी सात ते सव्वासातच्या सुमारास गोरेगाव येथील लक्ष्मीनगर, महाकाली मंदिरामागील पुर्नवासी गल्लीत घडली. याच गल्लीतील रुम क्रमांक सातमध्ये प्रथमेश कारंडे हा त्याचा वयोवृद्ध आई-वडिल भोलेनाथ, साधना आणि लहान भाऊ अभिषेक, ऋषिकेश यांच्यासोबत राहतो. तो राजस्थानच्या एका टिन कंपनीत कामाला आहे. दिवाळी असल्याने तो राजस्थानातून मुंबईतील घरी आला होता. गेल्या एक वर्षांपासून त्याची आई साधना हिला पॅरेलस झाल्याने ती घरीच असते तर ८ नोव्हेंबरला त्याचे वडिल भोलेनाथ हे जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी ९ नोव्हेंबरला प्रथमेश हा त्याच्या मुलीसोबत गोरेगाव रेल्वे स्थानकात शॉपिंगसाठी गेला होता. घरातून जाताना अभिषेक आला होता. त्याने मद्यप्राशन केले होते.
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक पगारावरुन घरातील सर्वांशी वाद घालत होता. त्यांना शिवीगाळ करत होता. त्या दिवशीही त्याने प्रथमेशला शिवीगाळ केली होती, मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करुन तो घरातून निघून गेला. रात्री पावणेआठ वाजता तो घरी आला होता. यावेळी त्याला त्याची आई साधना ही घरातच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचे दिसून आली तर बाजूला अभिषेक दारुच्या नशेत पडला होता. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. या प्रकाराने त्याला धक्काच बसला होता. चौकशीदरम्यान त्याला दारुच्या नशेत अभिषेकनेच साधना यांना बेदम मारहाण केल्याचे, तिचे डोके जमिनीवर आपटल्याचे समजले होते. त्यात ती गंभीररीत्या जखमी होऊन बेशुद्ध झाली होती. या घटनेनंतर त्याने प्रथमेशशी वाद घालण्याचा प्रयत्न केला.
ही माहिती नंतर प्रथमेशने त्याची दोन्ही बहिणी निकिता आणि निवेदिता यांना सांगितली. त्यानंतर त्या दोघीही घरी आल्या होत्या. त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या साधना यांना तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ती बेशुद्धावस्थेत असल्याने तिच्यावर तिथे उपचार सुरु करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिच्या मेंदूला गाठी झाल्या होत्या. उपचारादरम्यान तिचा शुक्रवारी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्रथमेशच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अभिषेक याच्याविरुद्ध आधी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता साधना कारंडे यांचा मृत्यू झाल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राथमिक तपासात अभिषेक याला तो स्वतच घरातील खर्च भागवत असून बाकीचे फक्त मजा करतात अशी भावना होती. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. याच रागातून त्याने त्याच्या आजारी वयोवृद्ध आईला बेदम मारहाण केली. तिचे डोके आपटून तिला गंभीर दुखापत केली. तिच्या गळ्याभोवती ओरचडे होण्यास कारणीभूत ठरला होता. चौकशीत तशी कबुलीच त्याने दिलीआहे. दुसरीकडे कौटुंबिक वादातून मुलानेच वयोवृद्ध आईची हत्या केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.