सिनेमासह वेबसिरीजच्या नावाने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

भोजपुरी अभिनेत्रीला अटक तर दोन तरुणींची सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ सप्टेंबर २०२५
ठाणे, – सिनेमासह वेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून बॉलीवूडमध्ये करिअर करणार्‍या गरजू तरुणींच्या मदतीने सुरु असलेल्या एका हायफाय सेक्स रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेच्य अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत एका अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली असून तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका केली आहे. अटकेत असलेल्या अभिनेत्रीने काही हिंदी सिनेमासह वेबसिरीजमध्ये काम केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली तर सुटका केलेल्या दोन्ही तरुणींची मेडीकलनंतर महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठाणे शहरात सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून काही तरुणींना संपर्क साधून, त्यांना झटपट पैशांचे आमिष दाखवून सेक्स रॅकेटमध्ये आणले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी संबंधित रॅकेटच्या मुख्य आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या संपूर्ण कटात एका अभिनेत्रीचा सहभाग उघडकीस आला होता. ही अभिनेत्री तिच्या संपर्कात असलेल्या तसेच बॉलीवूडसह टिव्ही मालिकांमध्ये करिअर करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या तरुणींच्या संपर्कात होती. त्यांना पैशांचे आमिष दाखवून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत होती. ठाण्यातील वागळे इस्टेट, पडवळनगर, एम्फोटेक पार्कजवळील हॉटेल साई टच रेस्ट्रॉरंट ऍण्ड बारमध्ये अभिनेत्री काही तरुणींसोबत येणार आहे. तिथे ग्राहकांसोबत संबंधित तरुणींना शारीरिक संबंधासाठी वेगळ्या हॉटेलमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली आंधळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक दिक्षा ढाकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर पाटील, पोलीस हवालदार आर.यू सुवारे, व्ही. जी नाईक, महिला पोलीस नाईक एस. के कोल्हे, एच. आर थोरात, पोलीस अंमलदार व्ही. के निकम यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. शनिवारी दुपारी तीन वाजता तिथे आरोपी अभिनेत्री दोन तरुणींसोबत आली होती. तिची हालचाल संशयास्पद वाटताच तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका केली. चौकशीदरम्यान या तरुणींना तिथे सिनेमा आणि वेबसिरीजच्या नावाने आणून ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठविले जाणार असल्याचे उघडकीस आले होते. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळणार होती.

तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी आरोपी अभिनेत्री महिलेस अटक केली. तिच्याविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुटका केलेल्या दोन्ही तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते, मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. तपासात आरोपी महिला अभिनेत्री असून तिने द अनवॉण्टेड गिफ्ट, जिल्हा ग्रिडी तसेच तीन भोजपुरी सिनेमामध्ये काम केले आहे. तू देखी मेरी फोटो, बंद दरवाजा, छू ले जरा, तलब उल्लूसह दहा वेबसिरीजमध्ये काम केले आहे.

तिची हिंदीसह भोजपुरी चित्रपटाशी संबंधित काही बड्या लोकांशी ओळख होती, त्याचाच तिने गैरफायदा घेऊन हिंदी, वेबसिरीज तसेच टिव्ही मालिकांमध्ये काम करणार्‍या तरुणींना आपल्या जाळ्यात अडकविले होते. त्यांना हिंदी सिनेमासह वेबसिरीजमध्ये काम देण्यासह झटपट पैशांचे आमिष दाखवून ती सेक्स रॅकेट चालवत होती. या रॅकेटमध्ये आरोपी अभिनेत्रीसह इतर कोणाचा सहभाग आहे का, ती आणखीन किती तरुणींच्या संपर्कात होती, त्यांच्या मदतीने तिच्यासह इतर तरुणींनी कुठल्या पॉर्न फिल्म किंवा अश्‍लील वेबसिरीजमध्ये काम केले आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page