भरवेगात जाणार्या बाईकची संरक्षक भिंतीला धडक लागून अपघात
अपघातात दोन बंधूंच्या मृत्यूने स्थानिक रहिवाशांमध्ये शोककळा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ सप्टेंबर २०२५
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका बाईकस्वाराचा बाईकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने बाईकची गंगोत्री इमारतीच्या संरक्षक भिंतीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन बंधूंचा समावेश असून त्यातील एक भाऊ पंधरा वर्षांचा आहे. सुमीत सतवान वाल्मिकी आणि संजू सतवान वाल्मिकी अशी या दोन बंधूंची नावे आहेत. याप्रकरणी सुमीतविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतसह भावाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने भेट दिली होती. दरम्यान वाल्मिकी बंधूंच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
हा अपघात बुधवारी २३ सप्टेंबरला पहाटे पावणेपाच ते पाचच्या सुमारास कुलाबा येथील नानूभाई मुसा मार्ग, गंगोत्री इमारतीच्या संरक्षण भिंतीजवळ झाला. २२ वर्षांचा सुमीत हा मूळचा उत्तरप्रदेशच्या बदायू, पिपरीचा रहिवाशी असून सध्या तो त्याच्या कुटुंबियांसोबत कफ परेड येथील गणेशमूर्तीनगर, गल्ली क्रमांक सतरा, रुम क्रमांक ५९९ मध्ये राहतो. पंधरा वर्षांचा संजू हा त्याचा लहान भाऊ आहे. बुधवारी पहाटे पावणेपाच वाजता तो संजूसोबत त्याच्या बाईकवरुन कुलाबा येथून जात होता. नानूभाई मुसा मार्ग, गंगोत्री इमारतीजवळून जाताना सुमीतचा बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्याच्या बाईकने संरक्षक भिंतीला जोरात धडक दिली होती.
या अपघातात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला, चेहर्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कुलाबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दोन्ही बंधूंना पोलिसांनी तातडीने जी. टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. अपघातानंतर पोलिसांसह फॉरेन्सिक टिमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती.
याप्रकरणी सुमीतविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतसह भावाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची कुलाबा पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. प्राथमिक तपासात सुमीतचा बाईक चालविताना नियंत्रण सुटले होते, त्यामुळे त्याने बाईक संरक्षक भिंतीला जोरात धडक दिली होती, त्यात त्याच्यासह त्याचा भाऊ जखमी झाले होते. उपचारापूर्वीच या दोघांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे बोलले जाते.