हेरॉईन तस्करीप्रकरणी रेकॉर्डवरील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

२.४० कोटीच्या हेरॉईनसह दोन वॉण्टेड आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – इतर राज्यातून आणलेल्या हेरॉईन या ड्रग्जची तस्करी करणार्‍या एका रेकॉर्डवरील आंतरराज्य टोळीचा मालवणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यंत वॉण्टेड असलेल्या दोन मुख्य आरोपींनी अटक केली असून या कारवाईत आतापर्यंत पोलिसांनी २ कोटी ४० लाख ३० हजार रुपयांचा ८०० ग्रॅम वजनाचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी दोन आरोपींवर अटकेची कारवाई झाल्याने या दोघांच्या अटकेने आता अटक आरोपींची संख्या चार झाली आहे. एजाज अफसरअली शेख, मोहम्मद दानिश इकराम ताजपुरा, नूरआलम नौशाद अन्सारी आणि आयन कुर्बान गौर अशी या चौघांची नावे आहेत. ही टोळी वेगवेगळ्या राज्यातून हेरॉईन आणून त्याची मुंबई शहरात विक्री करत असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे यांनी सांगितले.

१४ ऑगस्टला मालाडच्या मालवणी, खारोडी, अली तलाव रोडच्या लक्ष्मीनगर परिसरात काहीजण हेरॉईन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून एजाज शेख या ३४ वर्षांच्या आरोपीस अटक केली होती. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दिड लाखांचा पाच ग्रॅम वजनाचा हेरॉईनचा साठा सापडला होता. चौकशीत त्याला ते हेरॉईन विक्रीसाठी त्याचा मित्र मोहम्मद दानिश याने दिले होते. त्यानंतर या पथकाने मोहम्मद दानिश या १९ वर्षांच्या मित्राला ताब्यासत घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी ७९ लाखांचा २६३ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले होते. या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली होती, यावेळी एजाजच्या मित्राने त्याच्या संपर्कात असलेले दोन मुख्य आरोपी त्यांना हेरॉईन देत असल्याचे सांगितले.

या हेरॉईनची नंतर ते ड्रग्ज पेडलरच्या मदतीने विक्री करत होते. त्यामुळे या दोन्ही मुख्य आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेशकुमार ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिना मरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस शिपाई साजिद शेख, मुद्दस्सर देसाई, कालिदास खुडे, आदित्य राणे आदी पथकाने विलेपार्ले येथील एस. व्ही रोड, इर्ला टँकच सबानगर परिसरातून नूरआलम अन्सारी आणि आर्यन गौर या दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी एजाज आणि मोहम्मद दानिशला हेरॉईन विक्रीसाठी दिल्याचे तपासात उघडकीस आले. या दोघांकडून पोलिसांनी १ कोटी ५९ लाखांचा ५३३ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले आहेत. या तिन्ही कारवाईत आतापर्यंत पोलिसांनी ८०० ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले असून त्याची किंमत २ कोटी ४० लाख ३० हजार रुपये इतकी आहे.

अटक चारही आरोपी हेरॉईन तस्करी करणारी रेकॉर्डवरील आंतरराज्य टोळीचे सदस्य आहे. नूरआलम आणि या गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी आलिम अख्तर ते दोघेही उत्तराखंडच्या हरिद्वार, सिकरोडाचे रहिवाशी आहे. ते दोघेही उत्तराखंड येथून हेरॉईन आणत होते, त्यानंतर त्याची ड्रगज पेडलरच्या मदतीने मुंबई शहरात हेरॉईनची विक्री करत होते. अटकेनंतर नूरआलम आणि आर्यन या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page