फटाके फोडण्यावरुन १९ वर्षांच्या तरुणाची बेदम मारहाण करुन हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या अल्पवयीन मुलासह तिन्ही आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – फटाके फोडण्यावरुन झालेल्या वादातून नानू ऊर्फ शुभंकर जगदेव मुखिया नावाच्या एका १९ वर्षांच्या तरुणाची तिघांनी बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन हत्या केल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना जुहू पोलिसांनी अटक केली. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. इतर दोन आरोपींमध्ये राहुल संतोष मंडल आणि रवीकुमार सर्वनांन देवेंद्र यांचा समावेश असून अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नानू ऊर्फ शुभंकर हा विलेपार्ले येथील नेहरुनगर परिसरात राहतो. रविवारी रात्री अकरा वाजता तो त्याच्या चार मित्रांसोबत विलेपार्ले येथील सहकार भंडारजवळील एचडीएफसी बँकसमोरच फटाके फोडत होता. यावेळी तिथे आरोपी आले आणि त्यांनी त्यांना तिथे फटाके फोडण्यास मनाई केली होती. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याचा राग आल्याने आरोपींनी नानूसह त्याच्या एका मित्राला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. लाथ्याबुक्यांनी केलेल्या मारहाणीत ते दोघेही गंभीर जखमी झाले होते. बेशुद्धावस्थेत त्यांना स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
तिथे नानूला उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले तर त्याच्या मित्रावर उपचार सुरु करण्यात आले होते. ही माहिती प्राप्त होताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदाराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येसह गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना अवघ्या पाच तासांत पोलिसांनी राहुल मंडल आणि रवीकुमार देवेंद्र यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनीच फटाके फोडण्यावरुन झालेल्या वादातून नानूची हत्या केल्याची कबुली दिली. ते तिघेही विलेपार्ले येथील नेहरुनगर परिसरातील रहिवाशी आहे. अटकेनंतर राहुल आणि रवीकुमारला सोमवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अल्वयीन मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. दरम्यान शवविच्छेदनानंतर नानूचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपविण्यात आले होते.