३.३६ कोटीच्या कोकेनसह ३१ वर्षांच्या मेकअप आर्टिस्टला अटक

गोरेगाव येथे गस्त घालताना बांगुरनगर पोलिसांची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – गोरेगाव येथे कोकेन विक्रीसाठी आलेल्या एका ३१ वर्षांच्या मेकअप आर्टिस्टला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. फुलचंद ईश्‍वरदयाल कश्यप असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी ६७८ ग्रॅम वजनाचा कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ३ कोटी ३६ लाख रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. झटपट पैशांसाठी तो कोकेन विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत त्याच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सोमवारी २ नोव्हेंबरला बांगुरनगर पोलीस ठाण्याचे एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कोंडूभैरी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कर्पे, पोलीस हवालदार संदीप संकपाळ, पोलीस शिपाई मच्छिंद्र खेडकर, रोहित ओवळकर आदी पोलीस पथक परिसरात गस्त घालत होते. रात्री पावणेनऊ वाजता संबंधित पोलीस गोरेगाव येथील लिंक रोड, शिवम सोसायटीच्या दक्षिण वाहिनीवर गस्त घालत असताना तिथेच एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. यावेळी पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला, मात्र त्याला पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक मोबाईल आणि सहा ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले.

चौकशीत त्याने त्याच्या राहत्या घरी आणखीन कोकेनचा साठा ठेवल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच्यासोबत पोलीस पथक त्याच्या मालाडच्या मढ व्हिलेज, जरीमरी माता मंदिर रोड, मामू गल्लीतील घरी गेले होते. त्याच्या घरातून पोलिसांनी ६७२ ग्रॅम वजनाचा कोकेनचा साठा जप्त केला. ते कोकेन त्याने घरातील पोटमाळ्यावर लपवून ठेवले होते. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी ३ कोटी ३६ लाखांच्या ६७८ ग्रॅम वजनाचे कोकेनसह मोबाईल व इतर साहित्य असा ३ कज्ञोटी ३८ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई मच्छिंद्र खेडकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फुलचंद कश्यप याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात त्याचे नाव फुलचंद कश्यप असल्याचे उघडकीस आले. तो मूळचा उत्तरप्रदेशच्या उन्नाव, गंगाघाटचा रहिवाशी असून मेकअप ऑर्टिस्ट म्हणून काम करतो. गेल्या काही वर्षांपासून तो मामू गल्लीत राहत होता. झटपट पैशांसाठी तो कोकेन विक्रीचे काम करत होता. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले हाते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याला ते कोकेन कोणी दिले, ते कोकेन तो कोणाला देणार होता, त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page