विदेशात नोकरीच्या आमिषाने व्यावसायिकाची १९ लाखांची फसवणुक
विदेशात असलेल्या आरोपीविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी होणार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – विदेशात नोकरीचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सुमारे १९ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. प्रतिक जयेंद्र पवार असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा गुजरातच्या सुरतचा रहिवाशी आहे. सध्या तो ओमानला राहत असल्याने त्याच्याविरुद्ध लवकरच लुक आऊट नोटीस जारी करण्यात येणार आहे. प्रतिकविरुद्ध सुरत शहरात अशाच एका फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने मुंबईसह सुरत शहरात अनेकांना विदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
शुभांकर पार्थ वासू हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव परिसरात राहतात. त्यांची जेनेक्श व्हिसा सोल्यूशन नावाची एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनी एमबीए, एमबीबीएस आदी उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विदेशात विद्यापीठ मिळवून देणे, त्यांना शिक्षणासाठी पाठविणे तसेच त्यांच्या व्हिसाची व्यवस्था करणे आदी काम करते. या व्यवसायाशी संबंधित काही एजट एकमेकांना मदत करतात. १० जुलै २०२६ रोजी त्यांना प्रतिक पवार नावाच्या एका व्यक्तीने कॉल केला होता. त्याने त्याची युविन कन्स्ल्टन्सी नावाची एक कंपनी असल्याचे सांगून तो कंपनीचा मालक आहे. या कंपनीचे ओमान आणि गुजरातच्या सुरत शहरात कामकाज चालते. त्यांच्याकडे नॉर्वे देशाची ओस्लो या शहरात ऍमेझॉन वेअर हाऊस येथे काम करण्यासाठी नोकरी उपलब्ध आहे.
त्यांच्या परिचित कोणीही इच्छुक असल्यास संपर्क साधण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या चार विद्यार्थ्यांची नोकरीसाठी शिफारस केली होती. यावेळी त्याने नोकरीसाठी विद्यार्थ्यांचा व्हिसा, इतर कागदपत्रे आणि प्रोसेसिंग म्हणून प्रत्येकी सहा लाखांची मागणी केली होती. त्यांच्याकडे होकार येताच त्याने नोकरीची प्रोसेस सुरु केल्याचे सांगितले. याच दरम्यान त्यांनी त्याला १८ लाख ६४ हजार कॅश तर ५० हजार ऑनलाईनद्वारे पाठविले होते. या पेमेंटनंतर चारही विद्यार्थ्यांना लवकरच नोकरीसाठी पाठविले जाईल असे सांगण्यात आले. मात्र वेळोवेळी पाठपुरावा करुनही प्रतिकने त्यांना नोकरीसाठी पाठविले नाही. वेगवेगळे कारण सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी त्याला काम होत नसल्यास त्याचे पैसे परत करण्याची विनंती केली,
मात्र पैसे देतो असे सांगूनही त्याने नोकरीसाठी घेतलेली रक्कम परत केली नाही. विचारणा केल्यानंतर तो पैसे परत करणार नाही, तुला जे करायचे आहे ते कर अशी धमकी देऊ लागला. चौकशीअंती त्यांना प्रतिकने विदेशात नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडा घातला होता. अनेकांकडून पैसे घेऊन त्यापैकी कोणालाही नोकरीसाठी विदेशात पाठविले नव्हते. त्याच्याविरुद्ध सुरत शहरात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या घटनेनंतर त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात प्रतिकविरुद्ध तक्रार केली होीत.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपासात प्रतिक सध्या ओमान देशात वास्तव्यास आहे. तो भारतात अधूनमधून येत असल्याने त्याच्याविरुद्ध लवकरच पोलिसांकडून लुक आऊट नोटीस बजाविली जाणार आहे.