एटीएममध्ये फेरफार करुन पैशांवर डल्ला मारणारा गजाआड
२० ते २५ वेळा एटीएम मशिनला पट्टी लावून पैशांचा अपहार केला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – एटीएम मशिनमध्ये फेरफार करुन खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारणार्या एका आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. फरहानअली अफसरअली असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याच्या दोन सहकार्याचा सहभाग उघडकीस आला असून पळून गेलेल्या या सहकार्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या आरोपींनी २५ ऑक्टोंबरला दिवसभरात २० ते २५ वेळा एटीएम मशिनला पट्टी लावून सातहून खातेदारांच्या ४५ हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यांत वापरलेल्या एका कारसह ५६ हजाराची कॅश असा ४ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान उबाळे यांनी सांगितले.
आलोककुमार रामबाबू शर्मा हे कांदिवलीतील बाबरेकरनगर परिसरात राहत असून एका नामांकित बँकेत सिनिअर मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या बँकेची मालाडच्या मिठ चौकीजवळील लिंक रोड, पद्मानगर परिसरात एक शाखा आहे. २५ ऑक्टोबरला सायंकाळी सव्वासहा वाजता त्यांना गणेशकुमार नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन त्यांच्या बँकेच्या एटीएम मशिनला निळ्या रंगाची प्लास्टिकची पट्टी पैसे बाहेर येण्याच्या मार्गावर लावण्यात आली आहे. एटीएम मशिनमध्ये अज्ञात व्यक्तीने फेरफार केल्याचा संशय व्यक्त करुन पाहणी करण्याची विनंती केली होती. काही वेळानंतर त्यांना एका महिलेने कॉल करुन एटीएममधून पैसे काढल्याचे सांगितले, मात्र मशिनमधून पैसे बाहेर आले नाही अशी तक्रार केली होती.
या घटनेनंतर आलोककुमार हे त्यांच्या सहकार्यासोबत एटीएम सेंटरमध्ये गेले होते. तिथे त्यांनी एटीएम मशिनची पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने एटीएम मशिनमध्ये फेरफार केल्याचे दिसून आले. त्यांनी तेथील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात दोन व्यक्तींची संशयास्पद हालचाल दिसून आली. त्यापैकी एकाने एटीएम मशिनला पट्टी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे तिथे येणार्या खातेदारांचे पैसे विड्राल होत होते, मात्र मशिनमधून पैसे बाहेर येत नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वीचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना तीन व्यक्ती एका कारमधून येत असल्याचेि दसून आले. त्यांनी एटीएम सेंटरमध्ये जाऊन पैसे बाहेर येण्याच्या जागी पट्टी लावली होती. एटीएम सेंटरमध्ये पैसे काढणसाठी आलेला खातेदार पैसे निघत नसल्याने पुन्हा जात होता.
याच दरम्यान ते तिघेही पट्टी काढून खातेदाराने विड्राल केलेली रक्कम काढून घेत आणि पुन्हा पट्टी लावून निघून जात होते. २५ ऑक्टोंबरला दिवसभरात त्यांनी जवळपास वीस ते पंचवीस वेळा असा प्रकार केला होता. अशा प्रकारे या तिघांनी सात खातेदारांनी काढलेल्या ४५ हजार ५०० रुपयांचा परस्पर अपहार करुन खातेदारासह बँकेची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच आलोककुमार यांनी बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध चोरीा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान उबाळे यांनी तपास सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पवार यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान उबाळे, पोलीस शिपाई दळवी, गावित, केतके, मुलानी आदी पथकाने फरहानअली याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच त्याच्या सहकार्यांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असताना आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यांत वापरलेली कार आणि कॅश असा ४ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पळून गेलेल्या त्याच्या सहकार्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.