अकरा लाखांच्या दागिन्यांवर फ्लेअर मॅनेजरकडून हातसफाई
सीसीटिव्ही फुटेजवरुन चोरीचा प्रकार उघड होताच मॅनेजरला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ सप्टेंबर २०२५
मुंबई, – बोरिवलीतील एका ज्वेलरी शॉपमध्ये काम करणार्या सहाय्यक फ्लोअर मॅनेजरनेच शॉपच्या सुमारे अकरा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा संपूर्ण प्रकार शॉपमधील सीसीटिव्ही फुटेजमध्ये उघडकीस येताच आरोपी मॅनेजरविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच संदीप सुखलाल कडेचा या आरोपी मॅनेजरला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
सुभाशिष इलाभंतू इशर हे नवी मुंबईतील उल्वे परिसरात राहतात. सध्या ते बोरिवलनीतील स्काय सिटी मॉल, पहिल्या मजल्यावर असलेल्या सेनको गोल्ड ऍण्ड डायमंड या ज्वेलर्स शॉपमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत तिथे संदीप कडेचा हा कामला असून तो कांदिवलीतील सुभाष लेन, तिवारी भवनचा रहिवाशी आहे. शॉपमध्ये तो गेल्या एक वर्षांपासून सहाय्यक फ्लोअर मॅनेजर पदावर कामाला होता. २१ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता सुभाशिष इशर हे त्यांच्या सहकार्यासोबत शॉपमधील दागिन्यांची पाहणी करत होते. यावेळी त्यांना काही दागिने मिसिंग असल्याचे दिसून आले.
काऊंटरच्या मागील शो ग्लासमध्ये ठेवलेले तीन सोन्याची चैन, एक लॉकेट असा ११ लाख १७ हजाराचे दागिने नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्व बिलांची पाहणी केली होती, मात्र ते दागिने मिसिंग असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी शॉपमधील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. या फुटेजमध्ये ८ सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता आणि रात्री सव्वाआठ वाजता संदीप कडेचा हा शॉपमधील दागिन्यांची चोरी करत असताना दिसून आला. त्यामुळे त्यांनी त्याला शॉपमध्ये बोलावून याबाबत विचारणा केली होती. सुरुवातीला त्याने दागिने चोरी केली नसल्याचे सांगितले,
मात्र सीसीटिव्ही फुटेज दाखविल्यानंतर त्याने ११ लाख १७ हजाराचे तीन सोन्याचे चैन आणि एक लॉकेट चोरी केल्याची कबुली दिली. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत संदीपविरुद्ध तक्रार केली होती. यावेळी त्यांनी शॉपमधील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना दिले होते. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संदीपविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.
चौकशीत त्याने चोरीचे दागिने एका व्यक्तीला दिले होते. या व्यक्तीला तो ओळखत नाही. दागिने दिल्यानंतर त्याने त्याला धनादेश दिले होते. मात्र बँकेत धनादेश न वटता परत आले होते. तो त्याच्या मोबाईलवरुन संपर्कात होता. त्याच्या घरी पोलीस पथक गेल्यानंतर तो तिथे गेल्या पाच वर्षांपासून राहत नसल्याचे उघडकीस आले. संबंधित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच इतर काही गुन्हे बोलले जाते. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक चक्रधर शिंदे हे करत आहेत.