मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२६
ठाणे, – ठाण्यातील कळवा परिसरातील एका बिल्डरला आठ कोटीसाठी धमकाविणार्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. संतोष मनोहर बावडेकर, सिद्धेश हरिश्चंद्र बेंडकोळी आणि इम्तियाज इलियास मोमीन अशी या तिघांची नावे असून यातील संतोष हा या टोळीच्या म्होरक्या आहे. दहा लाखांचा पहिला हप्ता घेण्यसाठी आले असता या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने शुक्रवार ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार व्यवसायाने बिल्डर असून त्यांच्या कंपनीमार्फत ठाण्यात काही इमारतीचे प्रोजेक्ट सुरु आहे. एका इमारतीच्या वादातून त्यांना संतोष बावडेकर याने खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यांच्याविरुद्ध ईडी, सीबीआय आणि आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करुन त्यांचे सर्व प्रोजेक्ट बंद करण्याची तसेच त्यांच्यवर अटकेची कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडण्याची धमकी दिली होती. त्यांच्यावर भीती निर्माण करण्यासाठी त्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. विविध विभागात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी तसेच संपूर्ण प्रकरण लिगल करण्यासाठी संतोषने त्यांच्याकडे आठ कोटीची मागणी केली होती.
त्यासाठी संतोष व त्याचे सहकारी त्यांना सतत धमकी देत होते. या धमक्यांना कंटाळून त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेत संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, चित्रा चौधरी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ, दिपक जाधव, रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल माने, दयानंद नाईक, पोलीस हवालदार अविनाश पाटील, नागराज सोनकडे, प्रशांत निकुंभ, व्यकंट धायगोडे, शब्बीर फरास, नंदकुमार पाटील, दिपक जाधव, मुकूंद आव्हाड, संदीप महाडिक, शशिकांत सावंत, धनंजय आहेर, पोलीस शिपाई सागर सुरळकर, मयुर लोखंडे, अमोल ढावरे, प्रशांत लवटे, महिला पोलीस हवालदार दिपाली जाधव, मलिका बहिराम यांनी तपास सुरु केला होता.
पोलिसांच्या सांगण्यावरुन तक्रारदार बिल्डरने त्यांना दहा लाखांचा पहिला हप्ता देण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे संतोष बावडेकर, सिद्धेश बेंडकोळी आणि इम्तियाज मोमीन हे तिघेही खंडणीचा हप्ता घेण्यासाठी कळवा येथील ९० फुट रोड, केशव हाईट्स इमारतीजवळ आले होते. यावेळी तिथे आधीच पाळत ठेवलेल्या पोलिसांनी तिन्ही आरोपींना खंडणीची रक्कम घेताना शिताफीने अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील संतोष हा कर्नाटकच्या बेळगाव, सिद्धेश ठाण्याच्या कळवा तर इम्तियाज सांगलीच्या विजयनगरचा रहिवाशी आहे. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.