एम पूर्व मनपाच्या दोन अभियंतासह तिघांविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा दाखल

कामाच्या बिलाची रक्कम मंजूरीसाठी साडेतीन लाखांच्या लाचेची मागणी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२६
मुंबई, – गोवंडीतील एम पूर्व महानगरपालिकेच्या दोन अभियंतासह तिघांविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी लाचप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींमध्ये एम पूर्व विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश हनुमंतराव चांदोलकर, उपअभियंता अविनाश दत्तात्रय दुधभाते आणि खाजगी व्यक्ती विनित खाडे यांचा समावेश आहे. या तिघांना ३५ (३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. त्यांची लवकरच संंबंधित पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांच्यावर कामाच्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी साडेतीन लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे.

३४ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून त्यांची एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीला पिंक आर्मी योजनेतर्गत सार्वजनिक शौचालय स्वच्छेतेचे काम देण्यात आले होते. कंपनीकडून काम पूर्ण होताच गोवंडीतील एम पूर्व विभागात बिलाबाबत अर्ज करण्यात आले होते. संबंधित बिल मंजुर व्हावे यासाठी सहाय्यक अभियंता गणेश चांदोलकर आणि उपअभियंता अविनाश दूधभाते यांनी त्यांच्याकडे साडेतीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय त्यांचे पेमेंटचा धनादेश काढण्यात येणार नव्हता. त्यामुळे त्यांनी लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. ५ मे २०२६ रोजी ही तक्रार प्राप्त होताच त्याची दुसर्‍या दिवशी पडताळणी करण्यात आली होती.

तक्रारदारांनी लाचेची रक्कम जास्त असल्याने ती रक्कम कमी करण्याची विनंती केली होती. यावेळी गणेश चांदोलकर यांनी साडेतीन लाखांऐवजी दोन लाख रुपये देण्यास सांगितले होते. त्यानंतर अविनाश दूधभाते यांनीही त्यांच्याकडे लाचेची मागणी सुरु करुन ती रक्कम खाजगी व्यक्ती विनीत खाडे याच्याकडे देण्यास सांगितले होते. तपासात या दोघांनी दोन लाखांची लाच स्विकारचे कबुल करुन लाचेची रक्कम खाजगी व्यक्तीमार्फत घेण्याची तयारी दर्शविली होती.

या गुन्ह्यांचा चार महिन्यांपासून पोलिसांकडून तपास सुरु होता. अखेर बुधवारी ३० सप्टेंबरला एम पूर्व विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश चांदोलकर, उपअभियंता अविनाश दूधभाते आणि खाजगी व्यक्ती विनित खाडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी ७, ७ अ भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिन्ही आरोपींना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांची चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण पावले, पोलीस निरीक्षक् रजनी उंबरकर, पोलीस हवालदार तेली, पाडळे, रावराणे, महिला पोलीस हवालदार तोडणकर, नलावडे, पोलीस हवालदार खरुळे, पोलीस हवालदार चालक भुजबळ, पोलीस शिपाई चालक साबळे आदी पथकाने केल्याचे साहय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page