पुण्यात स्वस्तात ६२ गुंठे जमिन देण्याच्या आमिषाने चौघांची फसवणुक

४७ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२६
मुंबई, – पुण्यातील मावळ परिसरात स्वस्तात ६२ गुंठे जमिन देतो असे सांगून एका व्यावसायिकासह त्याच्या तीन मित्रांची एका भामट्याने सुमारे ४७ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या चौघांच्या तक्रार अर्जानंतर देवदन गगन पांढरे ऊर्फ त्यागी या भामट्याविरुद्ध साकिनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांत देवदनला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहे का याचा पोलिसांकडून संमातर तपास सुरु आहे.

अब्दुल रझाक अली हसन शेख हे व्यावसायिक असून ते त्यांच्या पत्नी आणि चार मुलांसोबत अंधेरीतील एस. व्ही रोडवरील मिलिनियर हॅरिटेज सोसायटीमध्ये राहतात. त्यांचा ऍल्युमिनियम फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून त्यांचे कार्यालय साकिनाका परिसरात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत त्यांना देवदन पांढरे यांनी संपर्क साधून त्याच्याकडे पुण्यातील मावळ तालुक्यात तीन एकर जमिन आहे. जमिन सर्व प्रकारच्या बोजा, तारण, न्यायालयीन वाद, तृतीय पक्षाचे हक्क आणि इतर अडचणींपासून मुक्त असून विक्रीयोग्य असल्याचे सांगितले होते. भविष्यात जमिनीला चांगला भाव मिळेल असे सांगून त्याने त्यांना जमिन खरेदीचा सल्ला दिला होता.

जमिनीच्या मूळ मालकाशी त्याचा करार झाला असून त्याच्याकडे जमिन विक्रीचे पूर्ण अधिकार प्राप्त आहे. तीन एकरपैकी ६२ गुंठे जमिन त्यांनी त्यांना स्वस्तात विक्री करुन देतो असे सांगितले. सुरुवातीला त्यांनी त्याला नकार दिला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ रोजी तो त्यांच्या कार्यालयात आला होता. जमिनीच्या व्यवहारात ४० लाखांची गुंतवणुक केल्यास सहा महिन्यांत ऐंशी लाख रुपये मिळतील असा विश्‍वास दाखविला होता. तरीही त्यांनी त्याचा प्रस्ताव नाकारला होता. दोन वेळा नकार देऊनही तो त्यांना सतत फोन, मॅसेज करुन जमिनीच्या खरेदीसाठी दबाव आणत होता. अखेर त्यांनी जमिनीचे सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर खरेदी-विक्रीचा व्यवहार करतो असे सांगितले होते.

ठरल्याप्रमाणे त्याने त्यांना मूळ मालकाचे कुलमुखत्यारपत्र आणि विक्री करार करुन देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्यासोबत जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु केला होता. जानेवारी २०२६ रोजी त्याने त्यांना कॉल करुन ती जमिन त्याने मूळ मालकाकडून खरेदी केली होती. काही पेमेंट बाकी आहे. ही रक्कम दिल्यानंतर जमिन त्यांच्या नावावर करतो असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांचे मित्र मोहम्मद ताहीर खान, मोहम्मद वाहिद कुरेशी आणि सलमान शेख यांच्याकडून काही रक्कम घेतली होती. त्यापैकी त्यांनी देवदन याला साडेनऊ लाख रुपये ऑनलाईन तर उर्वरित रक्कम कॅश स्वरुपात असे एकूण ४१ लाखांचे पेमेंट केले होते. ६२ गुंठे जमिनीचे संपूर्ण पेमेंट करुनही त्याने ती जमिन त्यांच्या नावावर करुन दिली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे जमिनीवर सीमाकंन, खांब करणे, खोदकाम आणि इतर विकासकामे करण्यासाठी सहा लाखांची मागणी केली होती, त्यामुळे त्यांनी त्याला पुन्हा सहा लाख रुपये पाठविले होते.

अशा प्रकारे त्यांनी जमिनीचा व्यवहार पूर्ण करुन देवदनला सुमारे ४७ लाख रुपये दिले होते, मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना जमिनीचे कागदपत्रे त्यांच्या नावावर करुन दिले नाही. त्याला संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे अब्दुल शेख हे त्यांच्या दोन मित्रांसोबत त्याच्या घरी गेले होते, मात्र तिथे तो त्यांना सापडला नाही. त्याच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंत त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करुन त्यांचे सर्व पैसे व्याजासहीत परत करण्याचे आश्‍वासन दिले. एप्रिल महिन्यांत देवदनने त्यांना संपर्क साधून पाच आठवड्यात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन जमिनीचा ताबा देण्याचे आश्‍वासन दिले, मात्र त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करु नका अशी विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली नाही.

मात्र पाच आठवडे होऊनही त्याने जमिनीचा ताबा दिला नाही किंवा त्यांच्या नावावर जमिनीचे कागदपत्रे करुन दिली नाही. त्यामुळे त्यांनी हा व्यवहारच रद्द करुन त्याच्याकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही. त्याने दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. अशा प्रकारे देवदन पांढरे यांनी पुण्यातील मावळ येथील ६२ गुंठे जमिन घुले कुटुंबियांच्या मालकीची असताना त्या जमिनीचा मालक तोच असल्याचे सांगून त्यांच्याशी जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन तक्रारदारासह त्यांच्या दोन मित्रांची सुमारे ४७ लाखांची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच अब्दुल शेख यांच्यासह सलमान शेख, वाहिद कुरेशी आणि मोहम्मद ताहीर आताउल्लाह खान यांनी साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर देवदन पांढरे ऊर्फ त्यागी याच्याविरुद्ध पोलिसांनी जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन चौघांची ४७ लाखांच्या अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. देवदनने अशाच प्रकारे जमिनीचा इतर कोणाशी व्यवहार करुन त्यांचीही फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page