फसवणुकीच्या गुन्ह्यांत निवृत्त पोलीस अधिकार्‍याच्या मुलाला अटक

कंटेनर व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाला घातला गंडा

0

अरुण सावरटकर
२ जुलै २०२६
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या मुंबई पोलीस दलातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झालेल्या पोलीस अधिकार्‍याच्या मुलाला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. संजय कृष्णा जाधव असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत राहुल शायलू यमला आणि राजकुमार अय्यर असे दोघेही सहआरोपी असून या तिघांनी कंटेनर व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणुक केली होती. पैशांची मागणी केल्यानंतर त्याने त्याचे वडिल वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तक्रारदार व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिली होती.

युवराज जगन्नाथ गायकवाड हे मालाड परिसरात राहत असून त्यांचा विलेपार्ले परिसरात एक झेरॉक्ससह मार्बल दुकान आहे. या दोन्ही व्यवयसायाच्या उत्पनातून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. पूर्वी ते त्यांच्या कुटुबियांसोबत विलेपार्ले परिसरात राहत होते. तिथेच त्यांची राहुलशी ओळख झाली होती. ते दोघेही एकमेकांना दहा वर्षांपासून ओळखत होते, त्यामुळे त्यांची चांगली मैत्री होती. राहुल हा विविध बँकेतून पर्सनल लोन देण्यासह प्रॉपटी एजंट म्हणून काम करत होता. एप्रिल २०२६ रोजी राहुल हा राजकुमार आणि संजय जाधव यांच्यासोबत युवराज गायकवाड यांच्या मालाड येथील घरी आला होता.

ते दोघेही जेएनपीटीहून वेगवेगळ्या प्रकारचे सामान भरलेले कंटेनर खरेदी करुन मशिदबंदर मार्केटमध्ये विक्री करण्याचा व्यवसाय करत असल्याने राहुलने त्यांना सांगितले होते. या व्यवसायात प्रचंड प्रॉफिट आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत व्यवसायात गुंतवणुक करावी अशी त्यांनी त्यांना ऑफर दिली होती. सुरुवातीला त्यांनी त्यांना नकार दिला, मात्र ते तिघेही त्यांची समजूत घालून त्यांना किमान दहा लाखांची गुंतवणुक करण्यासाठी आग्रह करत होते. या गुंतवणुकीवर त्यांनी त्यांना पंधरा दिवसांत चार लाख रुपये प्रॉफिट देण्याचे आश्‍वासन दिले होते. राहुलच्या विनंतीनंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.

ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना आरटीजीएसद्वारे दहा लाख रुपये दिले होते. ही रक्कम संजय जाधवच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. मात्र एक महिना उलटूनही त्यांनी त्यांना चार लाख रुपयांचे प्रॉफिटची रक्कम दिली नाही. याबाबत कॉल केल्यानंतर ते तिघेही त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक केलेल्या दहा लाखांची मागणी सुरु केली होती. यावेळी संजयने तो वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा मुलगा असून पैसे परत देणार नाही. तुला जे करायचे ते कर, मी दिलेला धनादेश बँकेत टाकला तर तुझे हातपाय तोडण्याची धमकी दिली होती.

या धमकीनंतर युवराज गायकवाड यांनी दिडोंशी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राहुल यमला, राजकुमार अय्यर आणि संजय जाधव या तिघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते तिघेही पळून गेले होते. त्यांचा शोध सुरु असताना दोन दिवसांपूर्वी संजय जाधव याला पोलिसांनी अटक केली.

चौकशीत त्याने इतर दोघांच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. संजयचे वडिल कृष्णा जाधव हे मुंबई पोलीस दलात होते, १९८८ साली ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्याच नावाचा वापर त्याने करुन तक्रारदारांना धमकी दिली होती. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page