गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चोरी करणार्‍या महिलांना अटक

नऊ गुन्ह्यांची उकल करुन 37 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 मे 2026
कळवा, – गर्दीचा फायदा घेऊन बॅगेतून सोन्याच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तू चोरी करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत दोन रेकॉर्डवरील सराईत महिलांना पोलिसांनी अटक केली. संगीता दशरथ पीठकर आणि सुरेखा बजरंग गायकवाड अशी या दोघांची नावे असून त्या दोघीही मुलुंडच्या रहिवाशी आहे. या दोघींच्या अटकेने चोरीच्या नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यांतील 37 लाख 19 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

72 वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला अंजनी दत्तात्रय सूर्यवंशी ही ठाण्यातील कळवा, पारसिक नगर, एव्हरग्रीन हाईट्स या अपार्टमेंटमध्ये राहते. 3 सप्टेंबर 2026 रोजी ती खारेगाव नाका ते ओझोन व्हॅलीदरम्यान बसने प्रवास करत होती. यावेळी बसमध्ये प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन तीन अज्ञात महिलांनी तिच्या बॅगेतील बारा तोळे सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर तिच्या लक्षात येताच तिने कळवा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात महिलांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. गेल्या काही वर्षांत बसमध्ये होणार्‍या गर्दीच्या फायदा घेऊन मौल्यवान वस्तूच्या चोरीच्या घटनेत प्रचंड वाढ झाली होती.

त्याची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस हवालदार संदीप महाडिक, प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल ढावरे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपी महिलांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ, पोलीस हवालदार संदीप महाडिक, प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल ढावरे यांनी मुलुंड येथून संगीता पीठकर आणि सुरेखा गायकवाड या दोघींना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच अंजली सूर्यवंशी हिच्या बारा तोळ्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्या दोघींही अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.

त्यांच्या अटकेने कळवा पोलीस ठाण्यातील सहा तर ठाणेनगर, राबोडी आणि नौपाडा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. गेल्या दोन वर्षांत त्यांनी संबंधित गुन्हे केले होते. या गुन्ह्यांतील 37 लाख 19 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यात 25 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. अटकेनंतर या दोघींनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ, दिपक जाधव, पोलीस हवालदार अविनाश पाटील, संदीप महाडिक, नंदकुमार पाटील, धनंजय आहेर, शशिकांत सावंत, महिला पोलीस हवालदार मलिका बहिरम, दिपाली जाधव, महिला पोलीस नाईक सुनिता चव्हाण, शारदा भारती, पोलीस शिपाई प्रशांत लवटे, अमोल ढावरे, सागर सुरळकर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page