मेडीकल इन्शुरन्स काढून बोगस दस्तावेज सादर करुन क्लेम मिळविला
खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरसह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 मे 2026
मुंबई, – नोकरी सोडून गेलेल्या एका कर्मचार्याच्या नावाने पाच लाख रुपयांचे मेडीकल इन्शुरन्स काढून त्याच्यावर जानेवारी महिन्यांत नवी मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाल्याचे बोगस दस्तावेज बनवून विमा कंपनीकडून क्लेम मिळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरसह दोघांविरुद्ध मेघवाडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशालबाबू रामजी गुप्ता आणि योगेश शुक्ला अशी या दोघांची नावे असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही मेडीकल इन्शुरन्सद्वारे विमा कंपनीकडून क्लेम मिळविला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
प्रकाश भास्कर पाटील हे कांजूरमार्गचे रहिवाशी असून जोगेश्वरीतील स्वप्नपूर्ती हॉस्पिटलमध्ये ते ऑफिस बॉय म्हणून काम करत होते. गेल्या वर्षी त्यांनी ती नोकरी सोडून दिली होती. मे 2025 रोजी त्यांना हॉस्पिटलमधील एक कर्मचारी फातिमा खानने कॉल करुन त्यांच्या मेडीकल इन्शुरन्सबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांनी कुठलाही मेडीकल इन्शुरन्स काढला नसल्याचे सांगितले. त्यावर तिने त्यांना डॉ. विशाल गुप्ता यांनी त्यांचा मेडीकल इन्शुरन्स काढला आहे. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना संशय निर्माण झाला होता, त्यामुळे त्यांनी फातिमाकडे मेडीकल इन्शुरन्सच्या कागदपत्रांची मागणी केली होती. यावेळी तिने त्यांना व्हॉटअपवर इन्शुरन्सचे कागदपत्रे पाठविले होते. या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या नावाने एका खाजगी विमा कंपनीकडून मेडीकल इन्शुरन्स काढल्याचे दिसून आले. त्यात त्यांच्या नावासह जन्मतारी, कंपनीचे नाव आणि इतर माहिती दिल्याचे दिसून आले.
ज्या कंपनीची माहिती देण्यात आली होती, त्या कंपनीत त्यांनी कधीच काम केले नव्हते, या कंपनीशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. मेडीकल इन्शुरन्ससाठी त्यांनी कोणालाही त्यांचे कागदपत्रे दिली नव्हती. त्यांची मेडीकल टेस्ट झाली नव्हती. तरीही त्यांच्या नावाने इन्शुरन्स काढण्यात आला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी संबंधित विमा कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क साधून त्यांच्या पॉलिसीबाबत विचारणा केली होती. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांच्या नावाने पाच लाखांची पॉलिसी काढण्यात आली होती. 13 जानेवारी 2025 रोजी त्यांच्यावर नवी मुंबईतील खारघर, सेक्टर बारा, व्हीएएमसी हॉस्पिटलमध्ये एक ऑपरेशन झाले होते. ते ऑपरेशन कॅशलेस स्किममधून झाले असून त्याचे क्लेम अमाऊंड 3 लाख 56 हजार 038 रुपये होते. सेंटलमेंट करुन हॉस्पिटलच्या बँक खात्यात 66 हजार रुपये जमा करण्यात आले होते.
त्यांच्यावर ऑपरेशन डॉ. योगेश गुप्ता यांनी केले होते. ही माहिती सांगून त्यांना क्लेमसंबंधित सर्व कागदपत्रे पाठविण्यात आले होते. या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यांच्यावर जानेवारी महिन्यांत कुठलेही ऑपरेशन झाले नव्हते. ते व्हीएएमसी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट नव्हते. तरीही त्यांच्या नावाने क्लेम करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर सेंटलमेंट करुन विमा कंपनीने हॉस्पिटलच्या बँक खात्यात 66 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. या क्लेमबाबत त्यांच्याशी विमा कंपनीने कुठलीही चर्चा केली नव्हती. त्यामुळे त्यांनी डॉ. योगेश गुप्ताशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांनी त्यांना डॉ. विशाल गुप्ताशी बोलण्यास सांगितले.
याबाबत चौकशी केल्यानंतर डॉ. विशाल गुप्ता आणि योगेश शुक्ला यांनीच संगनमत करुन त्यांच्या नावाने मेडीकल इन्शुरन्स काढून त्यांच्यावर व्हीएएमसी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाल्याचे कागदपत्रे बनवून त्यांच्या नावाने विमा कंपनीकडे क्लेमसाठी अर्ज केला होता. त्यांनी त्यांच्या नावाने बोगस दस्तावेज बनवून ते खरे असल्याचे भासवून त्यांच्यासह विमा कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी डॉ. विशाल गुप्ता आणि योगेश शुक्ला या दोघांविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. या दोघांनी इतर काही आजी-माजी कर्मचार्यांचे मेडीकल इन्शुरन्स काढून त्यांच्या नावाने विमा कंपनीकडून बोगस दस्तावेज बनवून क्लेम घेतले आहे का, अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या टोळीत इतर काही डॉक्टरांसह कर्मचार्यांचा सहभाग आहे का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे.