गोरेगाव येथे 29 वर्षांच्या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या परिचित मारेकर्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 मे 2026
मुंबई, – गोरेगाव येथे विकास अशोक भुसारे या 29 वर्षांच्या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या परिचित आरोपी भीमराज ओमप्रकाश शर्मा ऊर्फ अर्जुन असे या 42 वर्षांच्या मारेकर्याचे पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जुन्या गोष्टींचा राग मनात धरुन भीमराजने विकासची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ही घटना बुधवारी 13 मेला रात्री सव्वाआठ वाजता गोरेगाव येथील आरे मिल्क कॉलनी, वणीचा पाडा, युनिट पाचमध्ये घडली. याच परिसरात लक्ष्मी अशोक भुसारे ही महिला राहत असून विकास हा तिचा मुलगा आहे. याच परिसरातील संतोषनगर, महानगरपालिका स्कूलजवळील महापालिका वसाहतीत भीमराज हा राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. विकासविरुद्ध त्याला कुठल्या तरी गोष्टींचा राग होता. त्यातून त्याने त्याच्या हत्येची योजना बनविली होती. बुधवारी रात्री सव्वाआठ वाजता विकास हा वणीचा पाडा, युनिट पाचजवळ होता. यावेळी त्याने त्याच्याशी वाद घालून त्याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती.
काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार केले होते. त्यात विकासच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो जागीच कोसळला होता. हल्ल्यानंतर भीमराज तेथून पळून गेला होता. रक्तबंबाळ झालेल्या विकासला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी विकासची तक्रारदार आई लक्ष्मी भुसारे हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भीमराज ऊर्फ अर्जुनविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
हत्येनंतर तो पळून गेला होता, त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला गुरुवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने विकासची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्यात कुठल्या गोष्टींवर वाद होता, त्याच्याविरुद्ध त्याच्या मनात का राग होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.