मावशीच्या निधनानंतर दोन महिन्यांत साडेसात कोटीचा अपहार
मामाच्या मुलीसह नातेवाईकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 मे 2026
मुंबई, – खार येथे राहणार्या वयोवृद्ध डॉक्टरच्या मावशी निधनानंतर तिच्याच नातेवाईकांनी बँक खात्यातून सुमारे साडेसतरा कोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मामाच्या मुलीसह तिच्या नातेवाईकाविरुद्ध खार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आंचल माधवदास भांबानी आणि महेंद्र देवकीनंदन चोहितरमानी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी मावशीच्या मृत्यूची माहिती बँकेला न सांगता, तिच्या मृत्यू दाखला बँक जमा न करता अवघ्या दोन महिन्यांत साडेसतरा कोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. दिल्लीतील राहणार्या एका महिला नातेवाईकाच्या सतर्कमुळे हा संपूर्ण प्रकार उजेडात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिपा समर भाटिया ही महिला मूळची दिल्लीच्या तिलकनगर, एस. मुखर्जी पार्कची रहिवाशी आहे. तिचे पती व्यावसायिक असून त्यांचा गुरग्राम येथे स्वतचा व्यवसाय आहे. तिची 89 वर्षांची डॉ. वीणा गुरुमुख अडवाणी ही मावशी असून तिचा अनिल हा मुलगा आहे. ते दोघेही खार येथील दहावा रोड, सुमित्र अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक तीनमध्ये राहतात. अनिल हा गेल्या तीस वर्षांपासून स्किझोफ्रेनिया या आजाराने मानसिक दृष्ट्या विकलांग आहे. फेब्रुवारी 2026 रोजी तिला तिच्या मावशीचे निधन झाल्याची माहिती समजली होती. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने 24 ऑक्टोंबर 2025 रोजी पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. यावेळी पोलिसांनी डॉ. वीणा अडवाणी यांचा मृतदेह सापडला होता. यावेळी तिचा मुलगा अनिल हा घरीच होता.
ही माहिती समजताच ती मुंबईत आली होती. यावेळी तिला तिच्या मामाची मुलगी आंचल ही अनिलला तिच्यासोबत घेऊन गेली होती. सध्या अनिल हा कर्जत येथील कालिंडा रिहाब सेंटरमध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे ती अनिलला भेटण्यासाठी गेली होती, मात्र तो कोणालाही ओळखत नव्हता. मावशीच्या फ्लॅटची चावी आंचलकडे होती. तिने यापूर्वी बँकेत काम केले होते, त्यामुळे तिला तिच्या मावशीच्या बँकेतील खातेविषयी माहिती होती. त्यामुळे तिने तिची मावशी डॉ. वीणा आणि तिचा मुलगा अनिल अडवाणी यांच्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. ही माहिती काढताना तिला डॉ. वीणा अडवाणी यांच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यांत आंचल व तिचा नातेवाईक महेंद्र चोहितरमानी यांनी तिच्या बँक खात्यातील सुमारे साडेसतरा कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्याचे समजले.
महानगरपालिकेत चौकशी केल्यानंतर तिने 14 नोव्हेंबर 2025 रोजी मावशीचा मृत्यूचा दाखला प्राप्त केला होता. या मृत्यूच्या दाखल्याचा तिने स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी वापर केला होता. तिच्या मृत्यूची माहिती बँक अधिकार्यांना कळविणे गरजेचे होते, मात्र तिने तिच्या मृत्यूचा दाखला बँकेत सादर केला नाही. त्यामुळे बँकेला तिच्या मावशीच्या मृत्यूची कुठलीही माहिती नव्हती. याच दरम्यान आंचल आणि महेंद्र यांनी संगनमत करुन त्यांच्या बँक खात्यातील 17 कोटी 50 लाख रुपये ट्रान्स्फर करुन घेतले होते.
ही रक्कम डॉ. वीणा अडवणी हिने तिचा मुलगा अनिल याच्या भविष्यासह आजारासाठी सुरक्षित ठेवली होती. मात्र या रक्कमेचा त्यांनी अपहार करुन फसवणुक केली. हा प्रकार लक्षात येताच तिने आंचल भांबानी आणि महेंद्र चोहितरमानी यांच्याविरुद्ध खार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.