मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 मे 2026
मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) – भायखळा येथे समीर मोहम्मद आसिफ खान याच्यावर झालेल्या गोळीबाराचा गुन्हे शाखेने पर्दाफाश करताना मुख्य शूटरसह दोघांना काही तासांत माहीम परिसरातून अटक केली. सादिक लियाकत शेख आणि झिशान अन्वर खान अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सैफ शरीफ खान या मुख्य आरोपीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याने समीर मोहम्मद याच्यावर गोळीबार करण्याची सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.
ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजता डॉकयार्ड रोड, माझगावच्या मिनाक्षी अपार्टमेंटसमोरील सायबान हॉटेजजवळच घडली होती. समीर हा कुख्यात गुंड आसिफ मोहम्मद ऊर्फ आसिफ दाडी याचा मुलगा आहे. डॉकयार्ड रोड परिसरात त्याचे स्वतचे एक कार्यालय आहे. मंगळवारी सायंकाळी त्याच्या ऑफिसच्या दिशेने जात होता. यावेळी बाईकवरुन आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला. त्याने दोन गोळ्या फायर केल्या, त्यातील एक गोळी त्याच्या पायाला लागली होती. गोळीबारानंतर मारेकरी बाईकवरुन पळून गेला होता. जखमी झालेला समीर हा जे. जे हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याने तिथे घडलेला प्रकार डॉक्टरांना सांगितला.
गोळीबाराची माहिती मिळताच भायखळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी समीरची पोलिसांनी चौकशी केली, या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गोळीबाराच्या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला संमातर तपासाचे आदेश देताना आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम घेण्यास सांगितले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे, युनिट तीनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, युनिट दोनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक शरद धराडे, सुहास माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, रामदास कदम, राकेश देशमुख, सहाय्यक फौजदार अरुण घाटकर, कृतिबास राऊळ, दिपक पालांडे, पोलीस हवालदार सुहास कोंकणकर, गिरीश मोरे, सचिन सरवदे, पंकज भोसले, शिर्के, सुनिल हरड, स्वप्निल ढेरे, अनिकेत मारे, महिला पोलीस शिपाई दिपीका ठाकूर पोलीस शिपाई विकास चव्हाण, राहुल पाटील, किरण शेलार, लक्ष्मण दाईंगडे, मारुती खेडकर यांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन गोळीबारानंतर मुख्य शूटर माहीम परिसरात गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या पथकाने माहीम परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून सादिक शेख याला ताब्यात घेतले, चौकशीत त्याने समीर मोहम्मद याच्यावर गोळीबार केल्याचे उघडकीस आले. याकामी त्याला झिशानला मदत केली होती, त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे, बाईक आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. या गुन्ह्यांचा तपास भायखळा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राथमिक तपासात समीर मोहम्मद आणि सैफ खान यांच्यात आर्थिक वाद होता. गेल्या काही दिवसांपासून हा वाद विकोपास गेला होता. त्यातून त्याने समीर मोहम्मद याच्यावर गोळीबार करण्याची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे त्याने सादिक आणि झिशानला गोळीबाराची सुपारी दिली होती. त्यानंतर सादिकने समीर मोहम्मदवर गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर तो पळून गेला होता. रात्री उशिरा तो माहीम येथे आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना काही तासांत पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे अधिकारी करत आहेत.