वरळीतील एसआरए प्रोजेक्ट देतो असे सांगून 55 लाखांची फसवणुक
शासकीय म्हाडा कॉन्ट्रक्टरला गंडा घालणारा मुख्य आरोपी गजाआड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 नोव्हेंबर 2025
मुंबई, – वरळीतील एसआरए प्रोजेक्ट देतो असे सांगून म्हाडा एका शासकीय कॉन्ट्रक्टरला सुमारे 55 लाखांना गंडा घातल्याप्रकरणी एका मुख्य आरोपीस निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. शैलेश संतोष काकन असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत प्राची शैलेश काकन, यशवंत पवार आणि अविनाश म्हामूणकर असे तिघेजण सहआरोपी आहेत. या चौघांनी संगनमत करुन ही फसवणुक केल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
मोहम्मद नौशाद अल्लाउद्दीन खान हे वरळीतील लोटस, पटेलनगरचे रहिवाशी असून म्हाडाचे शासकीय कॉन्ट्रक्टर म्हणून काम पाहतात. त्यांना म्हाडाकडून काही शासकीय कंत्राट मिळत असून ते काम त्यांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण केले आहेत. ते खाजगी बांधकाम करत असल्याने त्यांना बांधकामाचे एस्टिमेंट देण्यासाठी प्लान बनवून घ्यावा लागतो. त्यासाठी त्यांना जाणकार व्यक्तींची गरज लागते. याच दरम्यान त्यांची यशवंत पवार आणि अविनाश म्हाणूनकर या ड्राफ्टमन असलेल्या दोघांची ओळख झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून ते त्यांच्याकडून वेगवेगळ्या बांधकामाचे प्लानचे बनवून घेत असल्याने त्यांचा त्यांच्यावर विश्वास होता.
वरळी परिसरात काही एसआरए प्रोजेक्टमधून जुन्या विकासकांना काढून टाकण्यात आले आहे. तिथे लवकरच नवीन विकासकाची नेमणूक होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याचाच फायदा घेऊन या दोघांनी त्यांना एसआरए प्रोजेक्टचे काम देण्याचे आश्वासन दिले होते. एसआरए कार्यालयात त्यांचा परिचित एक व्यक्ती असून तोच त्यांना एसआरए प्रोजेक्टचे काम देणार आहे असे सांगितले. त्यानंतर या दोघांनी त्यांची शैलेश काकनशी ओळख करुन दिली होती. शैलेश हा त्यांना एसआरए कार्यालयातील एका अधिकार्याच्या केबीनमध्ये घेऊन गेला होता. तिथे त्यांच्याच एसआरए प्रोजेक्टबाबत सविस्तर चर्चा झाली होती.
याकामी त्याचे साहेब त्यांना मदत करतील असे शैलेशने सांगितले होते. यावेळी एसआरए प्रोजेक्ट मिळविण्यासाठी काही खर्च अपेक्षित आहे. त्याशिवाय काम होणार आहे असेही शैलेशने मोहम्मद नौशादला सांगितले होते. एसआरए प्रोजेक्ट मिळावा म्हणून त्यांनी त्याला होकार दर्शविला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी शैलेशसह इतर तिन्ही आरोपींना टप्याटप्याने 45 लाख आरटीजीएस तर दहा लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. त्यानंतर त्यांच्या कंपनीने एसआरए कार्यालयात वरळीतील एसआरए प्रोजेक्टसाठी अर्ज केला होता.
काही दिवसांनी त्यांनी त्यांना एलओ आय लेटर तसेच असीमकुमार गुप्ता यांचे आयएएस अॅडिशनल चिफ सेक्रेटरी हाऊसिंग विभाग, मंत्रालयाचे बोगस पत्र व्हॉटअप पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे आणखीन एक कोटीची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला दोन धनादेश दिले होते, मात्र ते धनादेश त्यांना सांगितल्याशिवाय बँकेत टाकू नका असे सांगितले होते. दुसरीकडे दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना एसआरए प्रोजेक्टचे काम मिळवून दिले नाही. विचारणा केल्यानंतर ते तिघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच ते त्यांच्या मित्रासोबत एसआरए कार्यालयात मजगे यांच्याकडे गेले होते. त्यांना व्हॉटअपवर पाठविलेले कागदपत्रे दाखविले. यावेळी त्यांनी त्यांना ते सर्व दस्तावेज बोगस असून एसआरए कार्यालयातून अशा प्रकारे कोणालाही काम दिले जात नाही असे सांगितले. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी चारही आरोपींकडे पैशांची मागणी केली होती. यावेळी शैलेशची पत्नी प्राची हिने त्यांना पैसे परत मिळणार नाही, तुला काय करायचे ते कर अशी बोलून धमकी दिली होती.
या घटनेनंतर मोहम्मद नौशाद यांनी निर्मलनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गेल्या आठवड्यात शैलेश काकन, त्याची पत्नी प्राची काकन, ड्राफ्टमन म्हणून काम करणारे यशवंत पवार आणि अविनाश म्हामूणकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस शासकीय दस्तावेज देऊन एसआरए प्रोजेक्टसाठी घेतलेल्या 55 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत शैलेश काकनला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.