संगणक प्रोसेसरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने तिघांची फसवणुक
डोंगरीतील व्यावसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 नोव्हेंबर 2025
मुंबई, – संगणक प्रोसेसरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने तिघांची त्यांच्याच परिचित व्यावसायिकाने फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मोहम्मद हुसैन मोहम्मद आयुब खोजदा या आरोपीविरुद्ध डोंगरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर गुंतवणुकीच्या नावाने घेतलेल्या पावणेचौदा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. त्याने गुंतवणुकीच्या बहाण्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
मोहम्मद अवैस मोहम्मद जहीर कुरेशी हा व्यवसायाने व्यापार असून डोंगरीच्या तांडेल स्ट्रिट परिसरात राहतो. मोहम्मद हुसैन हा याच परिसरात राहत असून त्यांचा किंग सॅटेलाईट केबल नावाचा केबलचा व्यवसाय होता. त्यातून त्यांच्या कुटुंबियांची चांगली ओळख झाली होती. मोहम्मद अवैसचे वडिल हयात असताना आरोपी मोहम्मद हुसैन हा त्यांच्या घरी नियमित येत होता. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत त्याने मोहम्मद अवैसला कॉल करुन तो विदेशातून इंटेल, रायझन आणि ऑर्बिट एक्सप्रेस कंपनीचे संगणक आणि लॅपटॉपचे प्रोसेसर भारतात आणून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करतो. या व्यवसायात त्याला चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे त्याने त्याच्याकडे गुंतवणुक केल्यास त्यालाही चांगला फायदा होईल असे सांगितले होते.
या व्यवसायात त्याची फसवणुक होणार नाही असेही त्याने त्याला आश्वासन दिले होते. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने त्याच्यासोबत व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे नोव्हेंबर 2024 ते जानवेारी 2025 या कालावधीत त्याने त्याच्याकडे सव्वासहा लाख, त्याची आई शबाना कुरेशीने तीन लाख ऐंशी हजार, वडिलांचे मित्र शहजाद शम्सी यांनी साडेतीन लाख लाख असे 13 लाख 74 हजार 340 रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्याने मूळ रक्कमेसह 29 लाख 57 हजार 930 रुपये परत करण्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातीला काही रक्कम देऊन त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. मात्र नंतर त्याला नफ्याची रक्कम बंद केले होते. याबाबत विचारणा केल्यानंतरत तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
मोहम्मद हुसैनकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच मोहम्मद अवैस याने त्याच्यासह त्याची आई आणि वडिलांचे मित्र अशा तिघाच्या वतीने डोंगरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. प्राथमिक तपासात मोहम्मद हुसैनने संगणक प्रोसेसरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.